ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँक वाचवण्यासाठी सत्ताधारी आणि बॅंक बचाव कृती समिती एकत्र

अहमदनगर

बँकींग व्यवहार परवाना रद्द झालेली नगर अर्बन बँक वाचवण्यासाठी बँकेचे सत्ताधारी व त्यांचे विरोधक मानले जाणारे बँक बचाव कृती समितीचे पदाधिकारी एकत्र येण्याच्या प्रयत्नात असून, दोघांनी एकमेकांच्या साथीने बँक वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

बँक बचाव समितीचे प्रतिनिधी व बँकेच्या विद्यमान संचालकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक नुकतीच बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांच्या निवासस्थानी झाली.

यावेळी बँकेच्या संचालक मंडळातर्फे विद्यमान अध्यक्ष अशोक कटारिया, माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल तसेच संचालक मंडळ सदस्य अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, दीपक गांधी, मनेश साठे, गिरीश लाहोटी तसेच 2014 ते 2019 या काळातील संचालक अ‍ॅड. केदार केसकर व किशोर बोरा यांनी चर्चेत भाग घेतला तर बँक बचाव समितीतर्फे बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, वसंत लोढा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे, सीए राजेंद्र काळे, मनोज गुंदेचा, डीएम कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

या संयुक्त बैठकीत बँकेचे लायसन्स परत मिळविणे किंवा निदान बँकींग परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती मिळविणे या दोनच मुद्यांवर चर्चा झाली.

संचालक मंडळाने केंद्रीय अर्थ मंत्रालयासमोर मांडलेल्या अपिलाचा मसुदा यशस्वी होण्यासाठी त्यावर एकत्र चर्चा करून त्या मसुद्यामध्ये योग्य बदल सुचविण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ व बँक बचाव समितीची संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे व बँक बचाव समिती त्यासाठी आवश्यक सहकार्य करायला तयार आहे.

बँक बचाव समितीच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बँकेचे चेअरमन अशोक कटारिया यांनी बचाव समितीच्या प्रमुख सदस्यांना फोन करून चोपडा यांच्या निवासस्थानी संयुक्त बैठक घेण्याचे मान्य केले व त्यानुसार ही बैठक नुकतीच झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे