सावेडीत महाविकास आघाडीचा प्रचार ढोल-ताशा व तुतारीच्या गर्जनेत सुरू प्रभाग 7 मध्ये महाविकास आघाडीची प्रचार रॅली शहरात केवळ विकासाच्या वल्गना -अभिषेक कळमकर
अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाले असून, शहरातील विविध प्रभागांतून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.
सावेडी परिसरात ढोल-ताशांचा गजर, तुतारीच्या गर्जनेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार उत्साहात सुरू झाला.
सावेडी गावठाण येथील पवनसुत हनुमान मंदिरात नारळ वाढवून प्रभाग क्रमांक 07 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सखाराम शेळके (अ), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रतिभा अक्षय भगत (क) व योगेश बाबासाहेब सुडके (ड) यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली.
या प्रचार रॅलीदरम्यान उमेदवारांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाविकास आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. प्रचारात कार्यकर्ते, समर्थक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी विशेष उपस्थिती लावत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “शहरात केवळ विकासाच्या वल्गना केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना हा विकास कुठेच दिसत नाही. सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वांगिण विकास व जनसेवेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. निवडणूक आली की विकासकामांचा गाजावाजा केला जातो.”
ते पुढे म्हणाले, “या प्रभागात अजूनही अनेक भाग अंधारात आहेत, पथदिव्यांचा अभाव आहे. पाणीटंचाई ही गंभीर समस्या असून, फेज-2 पाणीपुरवठा योजना 12 वर्षे उलटूनही कोट्यवधी रुपये खर्च करूनही पूर्णत्वास गेलेली नाही.
शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ता असूनही विकास झाला नाही, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र भावना आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनीही मतदारांना संबोधित करत विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन केले.
“नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची जाण असलेले, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेले उमेदवार निवडून देणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.




