अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तागड वस्ती येथे महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना

घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला स्वयंपाकाचे काम करण्यासाठी परिसरात गेल्या असताना सोनिया घोडके व वृषाली तांदळे यांच्यात जागेच्या बांधकामावरून वाद सुरू होता.
हा वाद शांत करण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी वृषाली तांदळेने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद अधिक चिघळल्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण पुढील तपास करत आहेत




