ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

चौथे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन थाटात

कवी संमेलन, पुस्तक व स्मरणिका प्रकाशनाने साहित्यिकांमध्ये उत्साह..

सोलापूर ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित चौथे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कवयित्री मेहमूदा रसूल शेख यांच्या अध्यक्षतेखाली थाटात पार पडले.

संमेलनाचे उ‌द्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या पत्रामधील फातिमाबी शेख यांचा उल्लेख हा त्यांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा पुरावा आहे. फातिमाबी शेख यांचे काळजातले स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

आज त्यांच्या नावाने साहित्यिक सोहळे साजरे होत आहेत. मुस्लिम मराठी स्त्री साहित्यिक मोठ्या प्रमाणावर लेखन करत असून, हा मराठी सांस्कृतिक संचिताचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक खाजाभाई बागवान यांनी केले. यावेळी स्पंदन अहिल्यानगर स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस, मेहमूदा रसूल शेख, खाजाभाई बागवान आदी. स्मरणिका, युगस्त्री फातिमाबी शेख प्रातिनिधिक काव्यसंग्रह (संपादन अनिसा सिकंदर शेख), अनिसा शेख यांचा काव्यसप्तक हा काव्यसंग्रह, काळ काळांत, अहमदनगर साहित्यिक सूची (शब्बीर बिलाल), शेवटी सोबत काहीच येत नाही (नसीम जमादार) तसेच खाजाभाई बागवान लिखित सांस्कृतिक सावल्या हा समीक्षा ग्रंथ-या सर्व ग्रंथांचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फातिमाबी शेख साहित्यरत्न पुरस्कार सायराबानो चौगुले यांना, समाजभूषण पुरस्कार शहाजान शेख यांना, तर आदर्श शिक्षक पुरस्कार निलोफर फणिबंद यांना प्रदान करण्यात आला.

फातिमाबी शेख जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धातील बक्षीसपात्र यशवंत हिराबाई पगारे, कृष्णा अविनाश क्षीरसागर, ज्योत्स्ना डासाळकर, दादासाहेब शेख यांचा सन्मान करण्यात आला. तसेच इख्लास रमजान विशेषांकातील उत्कृष्ट कवितांसाठी बा. ह. मगदूम, सुमैट्या चौधरी, आलिया गोहर यांना गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक शफी बोल्डेकर, संस्थाध्यक्ष हाशम पटेल, संस्था सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल, गझलकार बा.ह. मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

वर्तमान सामाजिक चिंतन मांडताना संमेलनाध्यक्षा मेहमूदा शेख म्हणाल्या की, समाजाच्च्या व्यथा, वेदना व प्रश्न साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मांडणे अत्यावश्यक आहे. हिंदू-मुस्लिम भाईचारा कुठे हरवला, यावर चिंतन करताना आपली हिंदू-मुस्लिम संत साहित्य परंपरा जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी प्रा. डॉ. राहुल हांडे यांनी फातिमाबी शेख यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वाचे संदर्भ मांडले. फातिमाबी शेख यांची जयंती शाळा-महाविद्यालये तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांत साजरी व्हावी, तसेच फातिमा शेख यांच्या नावाने विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत फातिमाबी शेख प्रातिनिधिक काव्यसंग्रहच्या संपादिका अनिसा सिकंदर शेख वयांनी व्यक्त केले.

दुपारच्या सत्रात नुरजहाँ शेख (अकलूज) यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन झाले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्वांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन खाजाभाई बागवान यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे