
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने मंगळवारी (6 जानेवारी) दुपारी दिल्लीगेट भागात एक दुचाकी जप्त करून त्यातून एक लाखाची रोकड हस्तगत केली होती.
फैजान कुतुबुद्दीन जमादार (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घोळवे यांच्या फिर्यादीनुसार, ते आपल्या पथकासह गस्तीवर असताना दिल्लीगेट परिसरातील मोहनबाग येथे काही व्यक्ती पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तेथे दोन मोपेड दुचाकी संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एका दुचाकीची तपासणी करून ती सोडून देण्यात आली होती. तर दुसर्या दुचाकीबाबत कोणीही समोर न आल्याने ती जप्त करून तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.
त्याची तपासणी केली असता, त्यात एक लाख रूपये रोकड, दोन महागडी घड्याळे व इतर वस्तू आढळून आल्या. पंचनामा करून एक लाख 45 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर दुचाकी फैजान कुतुबुद्दीन जमादार याची असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला नोटीस बजावून पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याने पुरावे सादर न केल्याने सदर रक्कम मतदारांना वाटपासाठी असल्याच्या संशयावरून त्याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




