गुढीपाडवा या विषयावर एक सुंदर असा लेख लिहिलाय..- लेखन हिरकणी सौ.अनिता गुजर.. राहणार – डोंबिवली

साडेतीन मूर्तपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘गुढीपाडवा’.
सण जवळ आला की संपूर्ण घराची साफ सफाईला सुरवात होते. आईने आज जरा लवकर उठवले मला म्हणाली उठ पाडवा जवळ येतोय साफसफाई करायची आहे. तू सुद्धा मदत करायची नाहीतर बसशील मोबाईल घेऊन. काय ग आई म्हणत कशीबशी मी उठले आणि आटपून आईच्या मदतीला लागले. एका बाजूला आईचे उपदेश चालू होते. अग दोनचार दिवसांवर आलाय चैत्र पाडवा .
आपल्या मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष चालू होणार . जुनी जळमटे काढून घर स्वच्छ करायचे आणि आनंदाची समृद्धीची गुढी उभारायची. आईचे हे बोलणे ऐकून मी विचार करायला लागले की खर तर घरच्या साफसफाई प्रमाणे गरज आहे ती आपली मने साफ करायची.
एखाद्याबद्दलचा मनात असलेला राग ,रुसवा, गैरसमज दूर करायचा हा उत्तम मुहूर्त आहे. मनातील सारी किलमिशे दूर करून नव्याने नात जोडलं पाहिजे. मनाची पाटी कोरी करून पुन्हा श्री गणेशा गिरवायला पाहिजे. गुढीपाडव्याला जसे कडुलिंबाच्या पानाबरोबर गुळ खातात तसेच आपणही कडू गोड आठवणींची सांगड घालायला हवी .
तुला माहित आहे का..आपल्या गुढी पाडव्याला आध्यात्मिक, नैसर्गिक, सामाजिक महत्व आहे.
असे मानले जाते कि जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरवात झाली. त्यामुळे या सणाला अध्यात्मिक महत्त्व आहे.
श्रीराम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले. आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते.

तसेच असे मानले जाते की मराठा राज्याचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या विजयांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या साम्राज्यातील लोकांमध्ये शांती, एकता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी गुढी पाडवा साजरा केला.
चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. जी मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. म्हणून ह्या सणाला नैसर्गिक महत्वही आहे.
गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. ह्यावेळी हाती घेतलेले काम यशस्वी होते असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपल्या पारंपरिक पोषाखामध्ये एकत्र समजतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. ज्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासतात आणि म्हणूनच या सणाला सामाजिक महत्वही आहे.
गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि वेळू काठी हे माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी सामर्थ्याच्या वेळूकाठीच्या एका टोकाशी यशश्रीचा तांब्याचा कलश, वैभवाचे रेशमी वस्त्र, आरोग्यदायी कडुलिंबाची पाने आणि माधुर्याची साखरेची गाठी ,मांगल्याचा पुष्पहार लावून त्यापुढे सिद्धिदायी नारळ, संकल्पाची सुपारी,सौभाग्याचे हळदीकुंकू, स्थैर्याचा पाठ ठेवून पूजा केली जाते.गुढीभोवती रांगोळी काढली जाते. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.
याच साखरेच्या घाटयाचा गोडवा आपल्या नात्यात उतरवला पाहिजे. कोणाच्याही बद्दलचा राग, रुसवा दूर करून एकत्रपणे नवं चैतन्याची गुढी उभारून सर्वाने आनंदाने गुढीपाडवा साजरा करावा असे मला मनापासून वाटते, तुम्हाला पटतंय का हे?
मुहूर्तात या मुहूर्त
असे उत्तम वर्षारंभाचा,
प्रारंभ करू शुभ दिनी
सारे निस्वार्थी कार्याचा..!!
विवेकाचा असावा कलश
विश्वासाची वेळू काठी ,
कडुलिंब पाना संगे बघा
साखरेच्या शोभे गाठी..!!