फिरोदिया हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली शपथ, नायलॉन मांजाची केली होळी
अहिल्यानगर

महानगरपालिका व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, मानवी जीवन व पक्ष्यांना होणारी इजा याबाबत जनजागृती करण्यात आली.
नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत सामुहिक शपथ घेण्यात आली.माझी वसुंधरा अभियानात सहभागी होण्याची सामूहिक शपथही घेण्यात आली.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा वापर पतंगप्रेमी करत आहेत.या मांजाच्या विक्री व वापरावर राष्ट्रीय हरीत लवादाने बंदी घातली आहे.
याबाबत कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार महापालिकेने विविध पथके स्थापन करून तपासणी सुरू केली आहे.मात्र,नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.त्यामुळे महानगरपालिका, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.
दरम्यान, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या दर शनिवारी स्वच्छता अभियानात रासने नगर चौक ते डौले हॉस्पिटल बिल्डींग ते म्हाडा बिल्डींग परिसरात स्वच्छता मोहीम पार पडली.
यामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, जेटींग मशीनच्या साह्याने स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला.