
विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर महानगरपालिका गुन्हे दाखल करणार..
अनधिकृत फलकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई होणार – आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर शहरात आस्थापनांच्या जाहिरातींसाठी, तसेच सण उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहेत. महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेतली असून शहरात अनधिकृतपणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावलेल्या फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने फ्लेक्स मुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले असून, यापुढे फलक लावणाऱ्या आस्थापना, व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
शहरात फ्लेक्स, फलक लावण्यापूर्वी महानगरपालिकेची रीतसर परवानगी घ्यावी, असे आवाहन यापूर्वी वेळोवेळी महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर, फलक लावणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून यापूर्वी गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
आता महानगरपालिकेने पुन्हा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील अनधिकृत फ्लेक्स बुधवारी हटवले आहेत.
शहरात विनापरवाना फ्लेक्स लावू नये, रीतसर परवानगी घेऊन बोर्ड लावावेत, असे आवाहन महानगरपालिकेने अनेकवेळा केलेले आहे. तरीही विनापरवाना फ्लेक्स लावले जात असल्याने गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आता फौजदारी व दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.