अहिल्यानगर मध्ये थुंकी लावून पेरू विकणारा विक्रेता पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर

नगर शहरातील केडगाव परिसरात आरोग्याला धोका निर्माण करणारा आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका फळ विक्रेत्याने पेरू स्वच्छ करण्याच्या बहाण्याने तोंडातील थुंकी लावून ते ग्राहकांना विक्रीस ठेवले. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
थुंकी लावून पेरू स्वच्छ करण्याचा घृणास्पद प्रकार
तौफिक लतीफ बागवान (वय २६, रा. गजानन कॉलनी, मुकुंदनगर) असे आरोपी फळ विक्रेत्याचे नाव आहे. तो नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील हॉटेल रंगोलीसमोर एमएसईबी ऑफिसजवळ ७ सप्टेंबर रोजी दुपारी पेरू विक्री करत होता. त्यावेळी तो पेरू साफ करताना तोंडातील थुंकी वापरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
घटनेचा व्हिडीओ नागरिकांनी त्वरित मोबाईलमध्ये टिपला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. लोकांनी याला थेट आरोग्याशी खेळ करणारे कृत्य म्हटले.
पोलिसांची तातडीची कारवाई
प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तौफिक बागवान याला ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल राहुल मासाळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बीएनएस कलम २७४, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांचा संताप
धुंकी लावून फळ विक्री करण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अशा वर्तनाविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.