खतरनाक प्लॅन, साक्षी आणि मोहिनीच्या कारस्थानांनी महाराष्ट्र हादरला
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मुंबई – मागच्या 24 तासांमध्ये घडलेल्या दोन घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. कल्याणमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे.
तर दुसरीकडे पुण्यात सतीश वाघ हत्या प्रकरणाची उकलही पोलिसांनी केली आहे. कल्याण आणि पुण्याच्या या घटनांमध्ये दोन महिलांच्या सहभागामुळे खळबळ माजली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी आणि सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांना अटक केली आहे. कल्याण आणि पुण्याच्या प्रकरणात या दोन्ही महिलांचा सहभाग समोर आला आहे.
अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांची हत्या
सतीश वाघ यांच्या पत्नीनं प्रियकरासह त्यांच्या हत्येचा कट रचल्याच समोर आलंय. सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार आपल्याकडे याव्यात यातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे हत्या प्रकरणातील आरोपी अक्षय जवळकर यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
कल्याणच्या नराधमाची पत्नीही अटकेत
कल्याणमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली, याप्रकरणी आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. पण याप्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात विशालला साक्षीने मदत केल्याचं समोर आलं आहे. विशालने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. बँकेत काम करणारी विशालची पत्नी संध्यकाळी घरी आली तेव्हा तिला याबाबत समजलं.
विशाल आणि साक्षीने अल्पवयीन मुलीचा मृतदेह बॅगेत भरला. ही बॅग एका रिक्षेत टाकून विशाल आणि साक्षी बापगावला असलेल्या कब्रस्तानामध्ये गेले आणि त्यांनी मृतदेह तिकडेच टाकला. घरातल्या फरशीवर रक्ताचे डाग पडलेले असल्याने साक्षीने फरशीही पुसली. यानंतर विशाल साक्षीच्या माहेरी शेगावला गेला. पोलिसांनी शेगावमधूनच विशालला ताब्यात घेतलं.
मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणात आणि पतीला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी साक्षीला अटक केली आहे. मी विशालला मदत केली नसती, तर त्याने मलाही ठार केलं असतं, असं साक्षीने पोलीस तपासात सांगितलं आहे.