3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मच्छिमारांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा
फेंगल चक्रीवादळामुळे आतापर्यंत अनेक राज्यांना फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसांसाठी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये 2 डिसेंबरसाठी हवामान विभागाकडून जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उंचच-उंच लाटा उसळण्याचा अंदाच व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्र किनाऱ्यापासून दूर रहाण्याचा इशारा दिला आहे.
इतकंच नाही तर भूस्खलनाचाही धोका आहे. त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थानी रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हवामान खात्याने केरळ राज्यातील 4 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार येत्या 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
4 जिल्ह्यांना रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाने रविवारी केरळमधील 4 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूर या 4 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीनुसार, सोमवारी 2 डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच रविवारीही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी?
हवामान खात्याकडून एर्नाकुलम, त्रिशुर, कोट्टायम आणि इडक्की या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अलाप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, वायनाड, कन्नूर, कासरगोड, कोझिकोड आणि पथानामथिट्टासाठीही यलो अलर्ट आहे. तसेच कर्नाटकातील काही भागात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अन्य राज्यांमध्ये कसं असेल हवामान?
हवामान खात्यानुसार, राजधानी दिल्लीत 2 ते 4 डिसेंबरपर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस असेल. तर किमान तापमान 11 ते 12 अशं सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तसेच गुजरातमध्ये 1 आणि 2 डिसेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय ?
सिंधुदुर्गातील हवामानात बदल
तसेच तळकोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याकडून 3 ते 4 डिसेंबरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाच्या अंदाजामुळे काजू आणि आंबा बागायतदार चिंतेत आहेत.