आ. संग्राम जगताप यांनी केला मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांचा सत्कार, संपूर्ण नगर शहर पाठीशी राहण्याची ग्वाही
अहमदनगर

आमदार संग्राम जगताप यांनी हिंद सेवा मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयाला भेट देऊन मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांचा सत्कार केला. युवा पिढीला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी चालू असलेल्या त्यांच्या समाजकार्यात संपूर्ण नगर शहर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
सिताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी हे केवळ एक मुख्याध्यापक नसून समाजाला योग्य दिशा दाखविणारा विचारही आहेत. त्यांच्यावर जो हल्ला झाला, तो फक्त शारीरिक नसून तो समाज घडविणाऱ्या विचारांवरील हल्ला आहे. याच विचारांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण नगर शहर त्यांना पाठिंबा देत आहे.
हेरंब कुलकर्णी यांनी अशा अपप्रवृत्तीला न डगमगता पुढे येऊन समाजाला दिशा देण्यासाठी चळवळ उभी केली. त्यांच्या आदर्श कार्यामुळे देशाची पुढील पिढी म्हणजे चांगले विद्यार्थी घडले जातील. विद्यार्थीदशेमध्ये विद्यार्थ्यांचा पाया चांगल्या विचारांवर आधारित मजबूत असणे गरजेचे आहे. त्यातूनच देशाचे सक्षम नागरिक निर्माण होतील. वैचारिक पातळी चांगली असल्यास चांगला समाज निर्माण होत असतो. हेरंब कुलकर्णी यांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहेत. सामाजिक चळवळ उभी राहावी, यासाठी ते राज्यभर कार्य करत आहेत. हिंद सेवा मंडळाची टीम देखील चांगल्या विचाराची असल्यामुळे विद्यार्थ्यांची पुढची पिढी नक्कीच चांगली निर्माण होईल. आपण समाजामध्ये काम करत असताना चांगल्या विचारांची, दिशेची खरी गरज असते. सर्वसामान्य मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण देण्याचे काम हिंद सेवा मंडळ करत आहे. ही चळवळ राज्यात नव्हे तर देशात जाईल. हेरंब कुलकर्णी यांची सामाजिक कार्याची मशाल येणारी पिढी नक्कीच पुढे घेऊन जाईल असा विश्वास आ. जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, हिंद सेवा मंडळाचे मार्गदर्शक अजित बोरा, सुमतीलाल कोठारी, मकरंद खेर, संजय ढोणे, नितेश बनसोडे, विठ्ठल उरमुडे, विलास साठे, अमोल कदम, किशोर खरंगे, सुनील कुलकर्णी, लहू घंगाळे, बी.यु. कुलकर्णी यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.