भाजप आमदारासह 100 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भाजपचे आमदार तथा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह 100 भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रखंडातील मंगरोडीह ग्रामपंचायतीचे पंचायत सचिव तसेच एफएसटी अधिकारी मो. मन्सूर यांच्या तक्रारीवरून नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. झारखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता निवडणुकीमध्ये मोठ्या जमावासह बैठक घेणे हे आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र बाबूलाल मरांडी यांनी पत्रकारांशी बोलताना आपण फक्त हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो, कोणतीही बैठक घेतली नव्हती, असा दावा केला आहे.
21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत फोनवरून माहिती प्राप्त झाली. तसेच निवडणूक प्रतिनिधी प्रवीण मेहरा यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे बस पडाव, गिरिडीह येथील एचपी पेट्रोल पंपाजवळील मां काली हॉटेल येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये बाबूलाल मरांडी आणि त्यांचे सुमारे 80-100 समर्थक बैठक घेताना आढळल्याचा आरोप आहे.
हॉटेल परिसरात 15-20 वाहने उभी होती. या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रेही घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
21 फेब्रुवारी हा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अशा वेळी कोणतीही परवानगी न घेता मोठा जमाव जमविणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते, असे त्यांच्या विरोधकांनी म्हटले आहे.




