
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगरच्या तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. गोरख दळवी, अमोल हुंबे, संतोष अजबे, नवनाथ काळे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची सर्वांची प्रकृती तिसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता खालावल्याने सलाईन लावण्यात आले होते.
दरम्यान, यातील नवनाथ काळे या तरूणाची प्रकृती आज गुरुवारी सकाळी आणखी खालावली असल्याने त्यांना रूग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क केला. काही वेळात रूग्णवाहिका उपोषणस्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेतून नवनाथ काळे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची शुगर कमी झाली असून ब्लड प्रेशर वाढला असल्याची माहिती आहे.