पद्मशाली समाजाचा बागुलू पंडुगू उत्सव ३१ जुलै रोजी साजरा होणार..
अहिल्यानगर

पद्मशाली समाजाचा पारंपरिक बागुलू पंडुगू यंदा ३१ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अहिल्यानगर पद्मशाली वधू-वर मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गुंडांनी दिली.
आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या शुक्रवारी हा सण साजरा करण्याची परंपरा असून, धार्मिक श्रद्धा, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम या उत्सवातून अनुभवायला मिळतो.
यादिवशी शितळादेवी (पोशम्मा तल्ली) आणि लक्ष्मीमाता (लचमम्मा तल्ली) यांची विधिवत पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मीमातेची पारंपक जत्राही भरते. शितळादेवी आणि लक्ष्मीआई यांना नैवेद्य अर्पण करून समाजाच्या आरोग्यासाठी, रोगराईपासून संरक्षणासाठी तसेच सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. बागुलू पंडुगू हा सण पद्मशाली समाजात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो.
समाजातील प्रत्येक कुटुंबात गोड पुरी, मेथीची भाजी यांसह पारंपरिक नैवेद्य तयार करून देवीला अर्पण केला जातो. त्यानंतर पोतराजांसह पारंपरिक मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक तोफखाना येथील शितळादेवी मंदिर तसेच बालिकाश्रम रोडवरील जाधव मळ्यातील लक्ष्मीदेवी मंदिरात पोहोचते. दोन्ही ठिकाणी विधिवत पूजा-अर्चना होत असून मोठी यात्रा भरते.
या सणामागे धार्मिकतेबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय संदेशही दडलेला आहे. संतुलित पर्जन्यवृष्टी व्हावी, दुष्काळ किंवा अतिवृष्टीचे संकट टळावे, शेती समृद्ध राहावी, निसर्गाचे संवर्धन व्हावे आणि समाजात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी केली जाते. यंदाच्या बागुलू पंडुगूच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने घरटी किमान एक रोप लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करावा, असे आवाहन ऋषिकेश गुंडला यांनी केले आहे.

शितळादेवीला थंड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. दही, हळद टाकलेला भात, गोड पुरी, मेथीची भाजी, लिंबाची पाने, फुटाणे, नारळ, ओवा आणि थंड पाणी यांचा नैवेद्यात समावेश असतो. महिलावर्ग डोक्यावर थंड पाण्याचे कलश घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढतो. कलशामध्ये लिंबाच्या पानांच्या डहाळ्या ठेवण्यात येतात.
मिरवणूक गावाबाहेरील पोशम्मा आणि लचमम्मा देवीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर कलशाची स्थापना करून पूजा-अर्चना व नैवेद्याचा कार्यक्रम पार पडतो.
संपूर्ण महाराष्ट्रात बागुलू पंडुगू साजरा होत असला तरी अहिल्यानगर शहरातील हा उत्सव विशेष प्रसिद्ध मानला जातो. या सणासाठी बाहेरगावाहून अनेक समाजबांधव आणि पाहुणे अहिल्यानगरमध्ये येतात.
त्यामुळे तोफखाना येथील शितळादेवी मंदिर आणि बालिकाश्रम रोडवरील लचमम्मा (लक्ष्मीदेवी) मंदिर परिसरात दिवसभर यात्रेचे, धार्मिक कार्यक्रमांचे आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडते.
यानिमित्त ऋषिकेश गुंडला यांनी सर्व पद्मशाली समाजातील नागरिकांना बागुलू पंडुगूच्या शुभेच्छा देत हा सण पात्र पर्यावरणपूरक आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेतून साजरा करा असे आवाहन केले.




