अहिल्यानगर मनपाने घेतला निर्णय – घर भाड्याने दिलेल्या घरमालकांना मोठा दिलासा
अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेने मालमत्ता सर्वेक्षणांनंतर वाढलेल्या करवाढीच्या धास्तीत असलेल्या घरमालकांना अहिल्यानगर शहरात एक मोठा दिलासा दिला आहे.
रहिवासी भागात भाडेकरू ठेवणाऱ्या घरमालकांना भाड्याच्या उत्पन्नावर दुप्पट कर आकारणी करणाऱ्या नोटीस पाठवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व भीती पसरली होती. ही जनभावना लक्षात घेऊन आणि महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम न होऊ देता समतोल साधण्यासाठी, महासभेने भाड्याच्या दरानुसार कर न आकारता इमारतींच्या क्षेत्रफळानुसार कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय केवळ रहिवासी क्षेत्रातील १० हजार ९२९ भाडेकरू वापर असलेल्या मालमत्ताधारकांसाठी लागू असून, ४ हजार ७१ वाणिज्य वापराच्या मालमत्तांना मात्र व्यावसायिक दरानुसारच कर भरावा लागेल.
नागरिकांच्या तक्रारींनंतर नगरसेवक आणि महापौर ज्योती गाडे यांनी हा विषय लावून धरला होता, ज्याला आयुक्त यशवंत डांगे यांनी मान्यता दिली आहे.
या सर्वसमावेशक निर्णयामुळे शहरातील तब्बल ११ हजारांहून अधिक रहिवासी घरमालकांना वाढीव आर्थिक भारापासून मोठा दिलासा मिळाला आहे.




