अहिल्यानगर शहरातील बनावट सुगंधी तंबाखू, बनावट गुटखा, मावा तसेच एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या जीवघेण्या व्यवसायाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारून कठोर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याबाबत.

प्रति,
मा. श्री. संग्राम भैय्या जगताप,
विधानसभा सदस्य,
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ,
अहिल्यानगर..
अहिल्यानगर शहर आणि मुकुंदनगरसह विविध उपनगरांमध्ये बनावट सुगंधी तंबाखू, बनावट गुटखा, मावा तसेच एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची अवैध विक्री पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. या सर्व जीवघेण्या पदार्थांच्या विळख्यात शहरातील तरुण पिढी अडकत असून, अनेक कुटुंबांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी श्री. तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर शहरातील बनावट तंबाखू, गुटखा, सुगंधी तंबाखू आणि माव्याच्या अवैध विक्रीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचे दिसून आले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून हा व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सर्वांत गंभीर बाब म्हणजे, या अवैध व्यवसायातील काही लोक आपल्या नावाचा वापर करून हे उद्योग करीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाची तातडीने व गोपनीयपणे माहिती घ्यावी. आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, त्यांना कोणाचे संरक्षण आहे आणि त्यांचे पोलीस यंत्रणेतील कोणाशी संबंध आहेत, याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करावा.
अशा व्यक्तींविरुद्ध त्यांची जात, धर्म, पक्ष अथवा राजकीय संबंध न पाहता कठोर कायदेशीर कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडावे.
बाजारातील मूळ आणि दर्जेदार तंबाखूची किंमत १०० ग्रॅमसाठी सुमारे एक हजार ते दीड हजार रुपये असताना, त्याच नावाखाली बनावट व केमिकलयुक्त सुगंधी तंबाखू केवळ सहाशे रुपये किलो दराने विकली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. किंमतीतील ही प्रचंड तफावत संबंधित तंबाखूचा दर्जा, तिचे बनावट स्वरूप आणि त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांविषयी गंभीर प्रश्न निर्माण करते.
शहरात विकला जाणारा गुटखाही मोठ्या प्रमाणावर बनावट असल्याची माहिती आहे. कोणतीही अधिकृत प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी किंवा आरोग्यविषयक सुरक्षितता नसलेली केमिकलयुक्त तंबाखू आणि बनावट गुटखा तरुणांच्या शरीरात अक्षरशः विष पसरवत आहेत. त्यामुळे तोंडाचा कर्करोग, दात व हिरड्यांचे आजार आणि इतर गंभीर व्याधींचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे अवैध व्यावसायिक आज गडगंज झाले आहेत. या जीवघेण्या व्यवसायातून काही व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांची माया जमा केल्याचीही चर्चा आहे. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांचा त्यांनी उभारलेल्या स्थावर-जंगम मालमत्तेशी मेळ बसतो का, याची स्वतंत्र आर्थिक यंत्रणेमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या विक्रीचे व सेवनाचे प्रमाण अहिल्यानगर शहर आणि मुकुंदनगरसह विविध उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या अमली पदार्थाचा थेट परिणाम तरुणांच्या मेंदूवर होत असून, आपण काय करीत आहोत याचेही भान त्यांना राहत नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण, रोजगार, संसार आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे.
या सर्व व्यसनांना बळी पडणारे तरुण कोणत्याही एका समाजातील नाहीत. मुस्लिम समाजाबरोबरच हिंदू समाजातील तरुणही मोठ्या संख्येने बनावट तंबाखू, गुटखा आणि एमडी या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाला जातीय अथवा धार्मिक स्वरूप न देता संपूर्ण अहिल्यानगरच्या तरुण पिढीच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक आहे.
या अवैध व्यवसायाला पाठीशी घालणारी प्रमुख व्यक्ती “जितू” नावाचा एक बडतर्फ पोलीस कर्मचारी असल्याची गंभीर माहिती मिळत आहे.
संबंधित व्यक्तीचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेले कथित संपर्क, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि अवैध व्यावसायिकांशी असलेल्या संबंधांची वरिष्ठ व स्वतंत्र यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशीत आरोपांची सत्यता सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीसह त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न संपणार नाही. बनावट तंबाखू आणि गुटखा तयार करणारे उत्पादक, कच्चा माल पुरविणारे, वाहतूकदार, साठवणूकदार, विक्रेते, एमडीचे पुरवठादार, आर्थिक भागीदार, मुख्य सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संपूर्ण साखळी उघड झाली पाहिजे.
संग्राम भैय्या, या व्यवसायात सहभागी व्यक्ती हिंदू आहे की मुस्लिम, ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या पक्षाशी संबंधित आहे किंवा तिच्यामागे कितीही मोठे राजकीय पाठबळ आहे, याचा विचार न करता आपण या सर्व जीवघेण्या व्यवसायांविरोधात मोठे आणि निर्णायक जनआंदोलन उभारावे. पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि इतर सक्षम यंत्रणांवर लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यास भाग पाडावे.
बनावट सुगंधी तंबाखू, बनावट गुटखा, मावा आणि एमडी या अमली पदार्थाचा व्यवसाय संघटित टोळीमार्फत सातत्याने केला जात असल्याचे पुरावे आढळल्यास, लागू कायदेशीर निकषांनुसार संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मकोका) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. या अवैध व्यवसायातून उभारलेल्या संपत्तीची सक्षम आर्थिक तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून, गुन्हेगारी उत्पन्नातून मिळवलेली स्थावर-जंगम मालमत्ता, बँक खाती आणि बेनामी गुंतवणूक कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त व शासनजमा करण्यात यावी.
लाचखोरी, पोलीस यंत्रणेतील कथित संगनमत अथवा राजकीय वरदहस्तामुळे या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असेल, तर ही बाब अहिल्यानगर शहरासाठी अत्यंत घातक आहे. हा केवळ तंबाखू किंवा अमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न नाही; तर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तरुण पिढीला व्यसनाधीनता, कर्करोग आणि मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा प्रश्न आहे.
आपल्या आणि माझ्यामध्ये राजकीय अथवा वैचारिक मतभेद असले, तरी या गंभीर विषयावर आपण मोठे जनआंदोलन उभे केल्यास मी सर्व मतभेद बाजूला ठेवून आपल्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात सहभागी होण्यास तयार आहे. कारण व्यसनाला जात नसते, कर्करोगाला धर्म नसतो आणि उद्ध्वस्त होणाऱ्या आई-वडिलांच्या अश्रूंना कोणताही पक्ष नसतो.
एका आईचा मुलगा, एका बहिणीचा भाऊ आणि एका कुटुंबाचा आधार कायमचा नष्ट होण्यापूर्वी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची वेळ आली आहे. आपण या प्रश्नाला राजकीय नव्हे, तर मानवी आणि सामाजिक प्रश्न समजून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि व्यापक जनआंदोलनाची हाक द्यावी, ही कळकळीची विनंती आहे.
आपला,
शाकीर शेख
मोबाईल : ९८२२५५००२३




