अहिल्यानगर मधील खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच, महिला मंडळाधिकारी अटकेत..
अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला मंडळाधिकाऱ्याला अटक केली आहे. श्रीमती संगीता नारायण पुंड (वय ३७, मंडळाधिकारी कार्यालय, कापूरवाडी, वर्ग-३) असे अटकेतील लोकसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार हे व्यवसायाने चालक असून त्यांनी व त्यांच्या मित्राने मौजे बुऱ्हाणनगर येथील गट नं. ६ प्लॉट नं. ४९ मधील २१०.९० चौ.मी. क्षेत्र खरेदी केले होते. त्याची नोंद फेरफार क्र. ६८०२ अन्वये झाली होती, मात्र संगणकीय सातबारा होताना ती कार्यान्वित झाली नव्हती. त्यासाठी त्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी पुंड यांच्याकडे होती.
दि. २४ जुलै २०२६ रोजी तक्रारदार भेटीस गेले असता पुंड यांनी संगणकीकृत नोंद पूर्ण करण्यासाठी ५ हजारांची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने १ हजार रुपये दिले. उर्वरित ४ हजार रुपयांच्या मागणीबाबत तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
दि. २७ जुलै २०२६ रोजी मंडळाधिकारी कार्यालय, कापूरवाडी येथे पडताळणी कारवाई केली असता पुंड यांनी यापूर्वी १ हजार रुपये स्वीकारल्याचा दुजोरा देऊन उर्वरित ४ हजारांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तसेच तहसील कार्यालयातील “पुंडे मॅडमला किती द्यायचे” असे विचारल्यावर “तिच्याशी बोलू, तुमची भेट घालून देते” असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाले.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६२/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ प्रमाणे दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, सुपेकर यांच्या पथकाने केली.




