10 ते 11 मिनिटांत पोलिसांची मदत – ‘डायल 112’ ठरतेय नागरिकांची जीवनरेषा
अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज 250 हून अधिक कॉल

आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘डायल 112’ ही आपत्कालीन सेवा अहिल्यानगर जिल्ह्यात नागरिकांसाठी विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम ठरत आहे.
महिला अत्याचार, घरगुती हिंसाचार, अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच इतर गुन्हेगारी घटनांमध्ये नागरिकांकडून या हेल्पलाईनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, जिल्ह्यात दररोज 250 हून अधिक कॉल होत आहे.
गेल्या साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल 48 हजार 500 कॉल प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रत्येक तक्रारीवर पोलिसांकडून सरासरी 10 ते 11 मिनिटांत प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी डायल 112 सेवेला प्राधान्य दिले असून, या प्रणालीच्या कार्यक्षमतेवर ते स्वतः दररोज लक्ष ठेवून आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तक्रारीचा आणि पोलिसांच्या प्रतिसादाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने सेवा अधिक प्रभावी बनली आहे.
पूर्वी एखादी आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांना पोलिसांची मदत मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागत असे किंवा गावातील पोलीस पाटील, सरपंच अथवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून संपर्क साधावा लागत असे. त्यामुळे अनेकदा मदत मिळण्यास विलंब होत होता. मात्र, बदलत्या काळानुसार शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘डायल 112’ हा एकच आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता कोणत्याही नागरिकाला मोबाईलवरून केवळ 112 हा क्रमांक डायल करताच पोलिसांशी थेट संपर्क साधणे शक्य झाले आहे. डायल 112 ची कार्यपध्दतीही अत्यंत आधुनिक स्वरूपाची आहे.
नागरिकाने मोबाईलवरून 112 क्रमांकावर कॉल केल्यानंतर तो कॉल प्रथम नवी मुंबई येथील प्राथमिक संपर्क केंद्रात किंवा नागपूर येथील दुय्यम संपर्क केंद्रात पोहोचतो. तेथून कॉलरचे अचूक लोकेशन, संपर्काची माहिती आणि घटनेचा तपशील तात्काळ संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला पाठविला जातो. त्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाण्याकडे माहिती वर्ग करण्यात येते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे घटनास्थळ निश्चित करण्यासाठी वेळ वाया जात नाही आणि पोलिसांना त्वरित कारवाई करता येते.
या हेल्पलाईनचा सर्वाधिक उपयोग महिलांकडून होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. घरगुती हिंसाचार, विनयभंग, महिलांचा पाठलाग, धमकी देणे, कौटुंबिक वाद किंवा इतर अत्याचाराच्या घटनांमध्ये महिलांनी डायल 112 वर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून मदत केली आहे. याशिवाय अल्पवयीन मुलांशी संबंधित घटना, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास, भांडणे, संशयास्पद हालचाली, अपघात आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्येही नागरिकांकडून या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वेगाने पोहोचत असल्याने अनेक गुन्ह्यांमध्ये वेळीच हस्तक्षेप करणे शक्य झाले आहे. परिणामी, गुन्हे रोखण्यास आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होत आहे.
पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियंत्रण कक्षात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि त्यांचे सहकारी डायल 112 ची कार्यप्रणाली प्रभावीपणे सांभाळत आहेत. नियंत्रण कक्षात तीन शिफ्टमध्ये कामकाज सुरू असून प्रत्येक शिफ्टमध्ये चार कर्मचारी कार्यरत आहेत. सतत कार्यरत असलेल्या या यंत्रणेमुळे कोणत्याही वेळी आलेल्या आपत्कालीन कॉलवर त्वरित प्रतिसाद देणे शक्य होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डायल 112 ही सेवा नागरिकांसाठी खर्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
96 एमटीडी मशीन कार्यरत
अहिल्यानगर जिल्ह्यात ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी 96 एमटीडी (मोबाईल डेटा टर्मिनल) मशीन कार्यरत आहेत. त्यामध्ये 53 लहान आणि 43 मोठ्या मशीनचा समावेश आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात या मशीनवर येणारे कॉल स्वीकारण्यासाठी वर्षातील 365 दिवस, चोवीस तास कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कॉल प्राप्त होताच संबंधित पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना होते. त्यामुळे प्रतिसादाचा कालावधी कमी झाला असून नागरिकांना वेळेत मदत मिळत आहे.
गैरवापर केल्यास गुन्हा
या अत्यंत महत्त्वाच्या सेवेचा काही नागरिकांकडून गैरवापर होत असल्याची बाबही समोर आली आहे. काहीजण मद्यप्राशन करून अथवा विनाकारण पोलिसांना खोटी माहिती देतात. गंभीर गुन्हा किंवा आपत्कालीन घटना घडल्याचे सांगून पोलिसांना घटनास्थळी बोलावले जाते. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यानंतर माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यास पोलिसांचा वेळ, मनुष्यबळ आणि शासकीय संसाधनांचा अपव्यय होतो. परिणामी, खर्या गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण होते.
यामुळे अशा खोट्या कॉल करणार्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना विनाकारण किंवा खोटी माहिती देऊन हेल्पलाईनचा गैरवापर न करण्याचे आवाहन केले आहे.




