नगर शहरात राजकीय वैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात राजकीय वैमनस्यातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. निवडणुकीत आमचे काम का करत नाही, या कारणावरून सात जणांच्या टोळीने ठेकेदार तरुणाला लोखंडी कोयता आणि रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन शशिकांत अग्रवाल (वय 33, रा. आनंदबाग, बुरुडगाव रोड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी विकास झिंजुर्डे, दत्ता झिंजुर्डे, प्रशांत झिंजुर्डे, महेश झिंजुर्डे, ऋषीकेश चौधरी, योगेश गुंड आणि विनोद जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 30 डिसेंबर रोजी नगरसेवकाचा अर्ज भरण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना निवडणुकीत काम करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास चेतन अग्रवाल हे भोसले आखाडा येथील कोहिनूर किराणा दुकानासमोर थांबले होते.
त्यावेळी आरोपींनी तेथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विकास झिंजुर्डे आणि योगेश गुंड यांच्या हातात लोखंडी कोयता व रॉड होते.
आज याला जिवंत सोडायचे नाही, असे ओरडत विकासने चेतन यांच्यावर कोयत्याने प्रहार केला. इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.




