क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांची जन्म जयंती दिना निमित्ताने सावित्रीबाई फुले या विषयावर सुंदर सा लेख..
अहिल्यानगर- लेखन दत्तात्रय वारकड..

सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत! ” ज्योतीची ज्ञानज्योती तू , खरीखुरी क्रांतीज्योती तू , अक्षराचा वसा देऊनी, प्रकाशले नारी जगती” ! क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारतामधील स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जातात .
ज्योतिबा फुले यांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनीच केले व त्या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या.
भारतामधील पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले या गणल्या जातात. महिला मुक्ती दिन च्या आद्य प्रवर्तक म्हणून ओळखल्या जातात . सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनामध्ये साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाह नंतर अगोदर स्वतः शिक्षण घेतले व नंतर स्त्रियांना साक्षर बनविण्याचे महान कार्य केले. हे करत असताना तत्कालीन समाजाचा रोष त्यांनी पत्करला 19 व्या शतकामध्ये सामाजिक परिस्थिती चा अभ्यास करता असे आढळून येते की समाजामध्ये अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा अस्तित्वात होत्या, त्याचे निराकरण करण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केले.
स्त्री शिक्षणाचा पाया रचला अस्पृश्यता निवारण , समाजातील अनेक अनिष्ट चालीरीती , रूढी व परंपरा या विरुद्ध लढा देऊन या अनिष्ट प्रथा बंद केल्या उदाहरणार्थ बालहत्या, सतीची प्रथा, केशवपन प्रथा अस्पृश्यता, जातीभेद , लिंगभेद दारिद्रता , अज्ञान इत्यादी विविध महत्त्वाच्या बाबींवर सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी अविरत कार्य केले व त्याकरिता आपले आयुष्य वेचले .
समाजाचे कर्मठ समाजाचा रोष पत्करला, हाल अपेष्टा सहन केल्या परंतु आपले कार्य अविरत चालू ठेवले व लढा दिला. इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा निर्माण केल्या पहिली शाळा पुणे येथे भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली.
येथे स्त्रियांना शिक्षण दिले जाऊ लागले व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महिला आणि दलितांच्या शिक्षणाकरिता 1852 मध्ये ” महिला सेवा मंडळाची” स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले अहिल्यानगर (अहमदनगर)येथील मिस फेरार या ब्रिटिश शाळेतून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रेरणा घेतली होती. सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शिक्षण देण्याकरिता शाळेमध्ये जात असत तेव्हा कर्मठ समाज त्यांना अंगावर चिखल फेकत, दगड मारत असत व अपमानास्पद वागणूक देत असत परंतु त्या डगमगल्या नाही , तर त्यांनी आपला लढा चालूच ठेवला व स्त्रियांना साक्षर बनविण्याकरिता महान कार्य केले महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात.
जातीभेद , लिंगभेद व अन्यायकारक वागणूक या अनिष्ट प्रथा नाहीसा करण्याकरिता त्यांनी लढा दिला विधवांचे होणारे केशव पण थांबवण्याकरिता त्यांनी पुण्यात न्हाव्याचा संप देखील घडवून आणला होता त्या एक कवयित्री व लेखिका देखील होत्या. त्यांनी ” काव्य फुले” व ” बावनकशी “तसेच ” सुबोध रत्नाकर “यासारखे काव्यसंग्रह लिहिले.
28 जानेवारी 1863 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या राहत्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले येथे अनाथ बालकांना आश्रय दिला जाईल त्यांचे संगोपन केले जाई या अनाथ बालकांना महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आपलीच मुलं मानत. याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील जन्मलेल्या काशीबाई या विधवा महिलेचे बालक या अनाथ मुलाला ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले व हाच मुलगा पुढे डॉक्टर बनला महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे कार्यामध्ये ही सावित्रीबाई फुले यांचा मोठा सहभाग होता महात्मा ज्योतिबा फुले यांचे महानिर्वाण झाल्यानंतर इसवी सन 1890 नंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीबाई फुले यांनी वाहिली 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे पक्षाघात या आजाराने निधन झाले .
अंतयात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा मिळतो म्हणून ज्योतिबा फुले यांचा पुतण्या आडवा झाला आणि दत्तक पुत्र यशवंत याला विरोध करू लागला , त्यावेळेला सावित्रीबाई फुले धैर्याने पुढे आल्या व स्वतःने टिटवे धरले व अंतयात्रेच्या मध्यभागी चालल्या आणि आपल्या स्वतःच्या हाताने आपली पती ज्योतिबा फुले यांच्या पार्थिव देहाला अग्नी दिला.
यशवंत हा एका विधवा महिलेचा मुलगा होता त्याला विवाह करिता कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते म्हणून आपलाच कार्यकर्ता ज्ञानोबा ससाने नावाच्या व्यक्तीच्या राधा या नावाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह सावित्रीबाई फुले यांनी लावून दिला. हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.
3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती , क्रांतीज्योती या नावाने ही ओळखले जाते .
इ.स. 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले होते हा जीवघेणा आजार अनेकांचा जीव घेत होता त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांनाही प्लेग झाला यातच 10 मार्च 1897 साली वयाच्या 66 वर्षे त्यांची प्राणज्योत मालवली.
अशा या भारतातील स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला मुक्तीच्या आद्य प्रवर्तक ज्ञानज्योती क्रांतीज्योती माय माऊली सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र पावन स्मृतीला कोटी कोटी वंदन…




