ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. या मारूती सुझुकीच्या अधिकृत डिलरची तब्बल 41 लाख रूपयांची फसवणूक

अहिल्यानगर मधील बनावट यूटीआर क्रमांक व एडिट केलेले ऑनलाइन पेमेंटचे स्क्रीनशॉट पाठवून शहरातील महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. या मारूती सुझुकीच्या अधिकृत डिलरची तब्बल 41 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शोरूमचे अकाउंटंट शुभम संजय शिंदे (रा. सदर बाजार, भिंगार) यांनी सोमवारी (1 जून) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन गुरूनाथ पांडव (रा. निर्मलनगर, डोकेनगर शाळेसमोर, सावेडी) आणि संतोष त्रिंबक दळवी (रा. भगवान निवास, निर्मलनगर, सावेडी) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दळवी याने 3 जानेवारी 2026 रोजी महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज शोरूममधून पाच चारचाकी वाहने खरेदी केली होती. या वाहनांच्या मोबदल्यात पवन पांडव याने स्वतःच्या नावाचा 41 लाख रूपयांचा धनादेश दिला होता.

मात्र हा धनादेश अपुर्‍या शिल्लक रकमेमुळे बाऊन्स झाला. त्यानंतर संबंधितांनी वारंवार पैसे देण्याचे आश्वासन दिले. 4 एप्रिल रोजी दुसरा धनादेश दिला गेला; मात्र तोही बाऊन्स झाला. पैसे अदा करण्याऐवजी संशयित आरोपींनी शोरूमच्या व्यवस्थापनाला बनावट यूटीआर क्रमांक आणि एडिट केलेले ऑनलाइन व्यवहारांचे स्क्रीनशॉट पाठवून रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण केला.

संशयित आरोपी पवन पांडव याने शोरूमचे मुख्य व्यवस्थापक सचिन चांदणे तसेच फिर्यादी शुभम शिंदे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर विविध यूटीआर क्रमांकांचे स्क्रीनशॉट पाठवून पैसे खात्यात जमा झाल्याचे सांगितले. मात्र शोरूमच्या बँक खात्याची पडताळणी केली असता कोणतीही रक्कम जमा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे 18 एप्रिल रोजीही संशयित आरोपींनी चार वेगवेगळ्या यूटीआर क्रमांकांच्या माध्यमातून एकूण 40 लाख 90 हजार रूपये जमा झाल्याचे दर्शविणारे स्क्रीनशॉट पाठवले. मात्र प्रत्यक्षात शोरूमच्या खात्यात एक रूपयाही जमा झाला नव्हता. त्यामुळे संबंधित व्यवहार बनावट असल्याचे उघड झाले.

यापूर्वी शोरूमच्या वतीने 22 एप्रिल रोजी कोतवाली पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतरही संशयित आरोपींनी 16 लाख 32 हजार रूपयांचा आणखी एक धनादेश दिला, मात्र तोही अपुर्‍या निधीमुळे बाऊन्स झाला.

त्यामुळे संशयित आरोपींनी संगनमत करून शोरूमची आर्थिक फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर अखेर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे