कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात परवानगी घेऊन तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुस्लिम महिलांवरच गुन्हा, पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह.
अहिल्यानगर

सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ व सामाजिक असंतोष निर्माण होईल, असे कथित वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम महिलांवरच बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी मुस्लिम समाजातील महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नाझिया इलाही खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे कथित वक्तव्य केले होते. या प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी २९ जून २०२६ रोजी मुस्लिम समाजातील महिला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक जुलैला पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाण्यासाठी परवानगी घेण्याचे पत्र देण्यासाठी गेले होते व परवानगी चे पत्र सही शिकणे देखील घेण्यात आलेले आहे.
मुस्लिम महिलांचा शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेले असता यावेळी शेख नसीम खान यांनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून भेटीची विनंती केली. पोलीस अधीक्षक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कलबुर्गी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे सांगितले. त्यानुसार महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण घटना सांगितली आणि नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली.
मात्र, ज्या व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी न्याय मागण्यासाठी गेलेल्या मुस्लिम महिलांवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि कायदेशीर मार्गाने तक्रार करण्याचा अधिकार दिला आहे. अशा परिस्थितीत न्याय मागणाऱ्या महिलांनाच आरोपी ठरविणे योग्य आहे का, असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.
तसेच, अशा प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कायदा व पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नाझिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, तसेच न्याय मागण्यासाठी गेलेल्या मुस्लिम महिलांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून तो मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शेख नसीम खान, मुन्नी शेख, निदा शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील महिला उपस्थित होत्या.




