ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अदानी समूहाला महाराष्ट्रात १३ हजार कोटींचे कंत्राट

अदाणी समूहाला महाराष्ट्रात मिळालं १३ हजार ८८८ कोटींचं कंत्राट

काही महिन्यांपूर्वी हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अडचणीत सापडलेल्या अदाणी समूहाला आता महाराष्ट्रात तब्बल १३ हजार ८८८ कोटींचे दोन मोठे कंत्राट मिळाले आहेत. महावितरण कंपनीकडून अदाणी समूहाला ही कंत्राटं देण्यात आली आहेत.

यासाठी अदाणी समूहावर पुणे, बारामती, कोकण, भांडुप व कल्याण या ठिकाणांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्मार्ट मीटरसंदर्भातलं हे कंत्राट असून अदाणींव्यतिरिक्त इतर चार कंपन्यांनाही अशाच प्रकारची कंत्राटं देण्यात आली आहेत.

दोन कंत्राटं, लाखो स्मार्ट मीटर!

पुणे, बारामती, कोकण, भांडुप व कल्याण या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ही दोन कंत्राटं महावितरणकडून देण्यात आली आहेत. यामध्ये भांडुप, कल्याण व कोकण मिळून एकूण ६३ लाख ४४ हजार स्मार्ट मीटर बसवायचे असून पुणे व बारामतीमध्ये मिळून ५२ लाख ४५ हजार स्मार्ट मीटर बसवायचे आहेत. एकूण सहा कंत्राटं महावितरणकडून देण्यात आली असून त्यातली दोन कंत्राटं अदाणी समूहाला मिळाली आहेत.

नुकतंच अदाणी समूहानं मुंबईच्या बेस्टकडून अशाच प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्याचं तब्बल १ हजार कोटींचं कंत्राट मिळवलं होतं. यासंदर्भात अदाणी समूहाकडून प्रतिक्रिया देण्यासाठी कुणी उपलब्ध होऊ शकलं नसल्याचंही वृ्त्तात नमूद केलं आहे.

सर्वात मोठा स्मार्ट मीटर पुरवठादार

दरम्यान, महावितरणकडून मिळालेल्या या दोन कंत्राटांमुळे अदाणी समूह हा देशभरातील सर्वात मोठा स्मार्ट मीटर पुरवठादार बनल्याचं सांगितलं जात आहे. देशाच्या एकूण स्मार्ट मीटर बाजारपेठेत अदाणी समूहाचा हिस्सा तब्बल ३० टक्क्यांपर्यंत गेल्याचं बोललं जात आहे.

अदाणी समूहाव्यतिरिक्त एनसीसीला नाशिक, जळगाव (२८.८६ लाख मीटर-३४६१ कोटी) आणि लातूर, नांदेड, औरंगाबाद (२७.७७ लाख मीटर-३३३० कोटी) ही दोन कंत्राटं मिळाली आहेत. तर माँटेकार्लो व जीनस या दोन कंपन्यांना प्रत्येकी एका विभागाचं कंत्राट मिळालं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे