आयुक्त साहेब कुत्र्यांचा बंदोबस्त करा, कोणाचा जीव जाण्याची वाट नका पाहू – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा
अहिल्यानगर

सध्या अहिल्यानगर, सावेडी उपनगरा मध्ये मोठया प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांना पहाटेचे वेळेस फिरण्यास जाणे म्हणजे जीवितास धोका पोहचवणे आहे या साठी या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.
सावेडी उपनगरा मध्ये गुलमोहर रोड, पाईप लाईन रोड व तपोवन रोड या भागात मोठया प्रमाणात मोकाट कुत्रे टोळीने फिरत असतांना दिसतात व एकटा दुकटा माणूस किंवा मुले दिसले की ही कुत्रे झुंडीने त्याच्यावर धावून जातात व त्या मध्ये जखमी झाल्याचे प्रकारही मोठया प्रमाणात घडत असून या बाबत अहिल्यानगर महानगरपालीकेत चौकशी केली असता कुत्र्यांना पकडण्यासाठी कोणतीही यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे समजले असून ही बाब अतिशय गंभीर आहे.
साधे एखादे जनावर रस्त्यावर मरून पडले तरी पालिकेचे कर्मचारी उचलून नेत नाही व या बाबत विचाराणा केली असता ते आमचे काम नाही असे कर्मचारी सांगतात व या बाबत अधिकाऱ्याकडे विचारणी केली असता एखादा खाजगी माणसाला पाठवून काम करून घेतो आमच्याकडे या बाबत कोणतीही सुविधा नाही असे बेजबाबदार पणे सांगितले जाते. हीपण बाब अतिशय गंभीर असून या बाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
उपनगरामध्ये पहाटेचे वेळेस अनेक वृद्ध फिरायला निघतात तसेच अनेक शाळेतील विद्यार्थी व कॉलेज मधील विदयार्थी मुले, मुली क्लास व शाळेत जाण्यासाठी सायकल वर जातात अश्या वेळी ही मोकाट कुत्रे त्यांच्यावर धावून जातात व अश्या घटनेत नक्कीच एखाद्याचा जीवितास धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने कोणाचा जीव जाण्याची वाट न पाहता त्वरित या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.