ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफ्याचे आमिष..नगर तालुक्यात आयटी इंजिनियरची एक कोटीची फसवणूक

अहिल्यानगर

‘एसएमसी’ ग्लोबल सिक्युरिटीज ही ‘सेबी’ कडे नोंदणीकृत कंपनी असल्याचे सांगत एका आयटी इंजिनियरला 20 ते 30 टक्के नफ्याचे आमिष दाखवत मोबाईल अ‍ॅपवरून शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. या माध्यमातून 1 कोटी 10 लाख 80 हजार रूपये जमा झाल्यावर त्याला अ‍ॅपवर व व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

12 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी शेंडी (ता. नगर) येथील आयटी इंजिनियरने येथील सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून दोन व्हॉट्सअ‍ॅप नंबरधारक अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आयटी इंजिनियर असून त्यांनी सुरूवातीला पुणे व त्यानंतर लंडन येथे नोकरी केली आहे. ते सध्या पुणे येथील एका आयटी कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांनी 12 ऑक्टोबर 2024 रोजी इंस्टाग्रामवर ‘एसएमसी’ ग्लोबल सिक्युरिटीज’ या कंपनीची शेअर ट्रेडिंगबाबत जाहिरात पाहिली होती. त्यामध्ये कंपनीच्या अंतर्गत अ‍ॅप वापरून ट्रेडिंग करण्याचे सांगितले गेले होते. फिर्यादी यांनी त्या अ‍ॅपमध्ये खाते उघडल्यानंतर त्यामध्ये डिटेल्स भरले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉईंट केले गेले. त्यानंतर फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्याची माहिती पाठवून त्यामध्ये पैसे पाठविण्यास सांगितले गेले. संबंधित व्यक्तींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून 20 ते 30 टक्के जास्त नफा मिळेल असे सांगितले. फिर्यादीने विश्वास ठेऊन एक कोटी 10 लाख 80 हजार रुपये जमा केले.

दरम्यान, फिर्यादीने घेतलेल्या अ‍ॅपमध्ये त्यांना त्यांच्या एक कोटी 10 लाख 80 हजार रुपये व नफ्यासहित अंदाजे पाच कोटी 16 लाख 56 हजार 513 रुपये जमा झालेले दिसत होते. दरम्यान, फिर्यादीला पैशाची गरज असल्याने त्यांनी पैसे काढण्यासंदर्भात अ‍ॅपवर रिक्वेस्ट टाकली असता त्यांना 15 टक्के कमिनश फी भरण्याचे सांगितले गेले. खात्यामध्ये जमा झालेल्या पैशातून कमिशन फी वजा करण्याचे फिर्यादीने सांगितले असता संबंधित कंपनीच्या व्यक्तींनी तसे करण्यास नकार दिला व खाते बंद करण्यात येईल, असे फिर्यादीला कळविले.

त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी कंपनीच्या व्यक्तींकडे पैशाची मागणी केली असता त्यांना व्हॉट्सअ‍ॅप व कंपनीच्या अ‍ॅपवर ब्लॉक करण्यात आले. फसवणूक होत असल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आले व त्यांनी सायबर क्राईम पोर्टलवर यासंदर्भात तक्रार दाखल केली.

येथील सायबर पोलिसांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे