मार्कंडेय विद्यालयाच्या स्नेहसंमेलतान वनवासनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम आगमनाचा उत्साह साजरा
अहमदनगर

सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन.
शैक्षणिक गुणवत्तेवर मुलांचे भवितव्य ठरत नाही -डॉ. प्रसाद उबाळे.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच प्रा.बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांनी गीतांवर नृत्याचे सादरीकरण करुन देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. देशभक्ती व धार्मिक गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली होती. तर प्रभू श्रीराम यांचे वनवासनंतर अयोध्येत झालेल्या आगमनाचा उत्साह नाटिका व गीतांमधून भक्तीमय वातावरणात सादर करण्यात आला. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आये है! या गीताने सभागृहात उत्साह संचारला होता.
यावेळी जय श्रीराम…, सिया रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी सभागृह दणाणून निघाला. प्रारंभी ढोलपथक वादनाचे सादरीकरण करण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध ताल वाजवून ढोलच्या निनादात श्रीराम जयघोष, शिवस्तुती सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तर सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रदुषण, सार्वजनिक स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्या, मुलगी वाचवा…मुलगी शिकवा या विषयांवर जागृती केली.
सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे लिट्रसी डायरेक्टर डॉ. प्रसाद उबाळे, संस्थेच्या सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्वस्त राजेंद्र म्याना , नवनिर्वाचित संचालक भीमराज कोडम, मुख्याध्यापक संदीप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, शिक्षक प्रतिनिधी रंजना गोसके, कल्पना गोसकी, उच्च माध्यमिकचे समन्वयक अनिल आचार्य, प्राथमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी शोभा बडगू, माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल, अशोक सब्बन आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात माध्यमिकचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी श्रमिकांच्या मुलांना घडविण्याचे कार्य करत असलेल्या मार्कंडेय शाळेत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी व त्यांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी वार्षिक अहवाल सादर करुन कला, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचा आढावा घेतला. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कृत्रिम बुध्दिमत्तेची घौडदौड या हस्तलिखीताचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
डॉ. प्रसाद उबाळे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्तेवर मुलांचे भवितव्य ठरत नाही. कमी गुण मिळालेले मुले देखील भविष्यात मोठ-मोठ्या पदावर गेलेले आहेत. मुलांची शैक्षणिक गुणवत्तेची काळजी घेतला त्यांच्या शारीरिक विकासाची देखील पालकांनी काळजी घ्यावी. मोबाईल हातात आल्याने मुलांचे मैदानी खेळ कमी झाले असल्याची खंत व्यक्त करुन, त्यांनी सकस आहार देऊन मुलांना व्यायामाची सवय लावण्याचे आवाहन केले.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो, प्रत्येकामध्ये वेगळी क्षमता व गुण असतात. मुलांच्या अंगी दडलेले विविध कला-गुण ओळखून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांचे उज्वल भवितव्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. तानाजी काळुंगे, अर्चना साळुंके तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा दोमल व मंजूश्री धाडगे यांनी केले. आभार उत्तम लांडगे यांनी मानले.