सावेडी नाट्यगृहाच्या बंद पडलेल्या कामाच्या ठिकाणी दारू, बियरच्या बाटल्यांचा खच, बनला तळीरामांचा अड्डा
अहमदनगर

निधी उपलब्ध असून, कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सावेडी नाट्यगृह उभारणीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कधी सुरू होते तर ते लगेच बंद पडते. तब्बल एक दशकापासून हे काम रखडलेले आहे. याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रत्यक्ष इन कॅमेरा पाहणी करत सोशल मीडियातून लाईव्ह पोलखोल केली असता अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विविध ब्रँडच्या दारू, बियर, सोडा वॉटरच्या बाटल्या, सिगरेटची पाकीटं, माव्याच्या पुड्या यांचा अक्षरशः खच त्या ठिकाणी आढळून आला आहे.
हा तळीरामांचा अड्डा बनला आहे. काळे यांनी या धक्कादायक प्रकाराची लाईव्ह पोलखोल केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून नगरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना पाहायला मिळत आहे.
शहर काँग्रेसकडून शहरभर पोस्टरबाजी करत सुरू असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या ‘जुन्या विश्वासाच्या’ दाव्याचा पोलखोल सप्ताह राबविला जात आहे. त्याच्या दुसऱ्या चरणात हा धक्कादायक प्रकार किरण काळे यांनी नगरकरां समोर आणला आहे. यावेळी बोलताना काळे म्हणाले की, नाट्य, संगीत, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत, नाट्य रसिक आणि तमाम नगरकरांसाठी ही संतापजनक बाब आहे. मनपा, राज्य आणि देशात यांची एक हाती सत्ता असताना साधं मनपाच्या स्वमालकीच नाट्यगृह हे उभारू शकत नसतील तर नगरकरच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सत्तेच्या शिखरावरून कडेलोट करतील, असा घाणाघात काळे यांनी केला आहे.
काळे पुढे म्हणाले, सन २०११ मध्ये पहिल्यां दोन कोटींचा निधी शासनाने दिला. त्यानंतर आमच्या महाविकास आघाडी सरकारने २०२० मध्ये पाच कोटी दिले. हे पैसे शासनाचे, जनतेचे आहेत. पण सत्ताधारी असा डींडोरा वाजत आहेत की जणू काही यांच्या स्वतःच्याच खिशातून ते खर्च करत आहेत. हा निधी मनपाकडे पडून आहे. परंतु यांनी मोठ्या टक्केवारीची मागणी केल्यामुळे ठेकेदाराने काम अर्धवट सोडले होते.
दुर्दैवाने त्या ठेकेदाराचे निधन नंतर झाले. आता मनपाने नवीन टेंडर काढले आहे. मात्र त्याची साधी वर्क ऑर्डर देखील अजून दिलेली नाही. हे काम निधी आल्यापासून दीड, दोन वर्षातच पूर्ण व्हायला हवं होतं. माञ टक्केवारीला कंटाळून ठेकेदार पळून गेल्याचा आरोप काळेंनी केला आहे.
कलावंतांच्या आंदोलनाला केराची टोपली :
सर्वच क्षेत्रातील कलावंतांनी देखील यासाठी अनेक वेळा आंदोलनं केली. दहा वर्षांपूर्वी कलाकारांनी तत्कालीन मनपा आयुक्त यांना नाट्य परिषदेच्या वतीने सर्जेपुरा रंगभवनचे वाडिया पार्क करू नका असे लेखी निवेदन दिले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना रंगभवनच्या माध्यमातून कार्यक्रमांची मेजवानी मिळू शकली असती. मात्र त्या जागेत मनपाने साफसफाई करून पे अँड पार्कच्या धर्तीवर पार्किंग सुरू करण्याचा घाट घातला होता. पण तो कलावंतांनीच हाणून पाडला. अजूनही रंगभवन उभे राहू शकलेले नाही. नाट्यगृहाच्या जागेवर पूर्वी क्रीडा संकुल होते. त्याचा काही काळ ओपन थिएटर म्हणून देखील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपयोग होत होता. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेले ते संकुल देखील नेहरू मार्केट प्रमाणे पाडल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
शहराला वैभवशाली परंपरा :
नगर शहराच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचा गौरव करताना काळे म्हणाले की, सुप्रसिद्ध हिंदी – मराठी सिने, नाट्य अभिनेते सदाशिव अमरापूरकर, शाहू मोडक, मधुकर तोरडमल, तर अगदी अलीकडच्या मिलिंद शिंदे, बोक्या सातबंडे या व्यावसायिक लोकप्रिय असणाऱ्या बाल रंगभूमीवरील नाटकातील चिमुकला आरूष बेडेकर अशी मोठी परंपरा आहे. गायिका अंजली, नंदिनी गायकवाड, पवन नाईक अशी सांगितिक क्षेत्रातील अनेक नावाजलेले कलावंत देखील शहरात आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक या मातीत आहेत. राज्य नाट्य स्पर्धा नगरचे कलावंत दरवर्षी राज्याभर गाजवतात. मात्र मनपाची सांस्कृतिक क्षेत्राबद्दल असणारी अनास्था आणि त्याला न मिळणारा राजश्रय यामुळे शहराचे सांस्कृतिक वैभव धुळीला मिळण्याची दुर्दैवी वेळ आली आली असल्याची खंत किरण काळे यांनी यावेळी व्यक्त केले.
सत्तेच्या चाव्या हाती आल्यास रखडलेली कामे आम्ही पूर्ण करू :
मी स्वतः संगीताचा विद्यार्थी आहे. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर, शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेक यांचा सहवास मला लाभला. सांस्कृतिक क्षेत्राशी माझा कायमच जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. भविष्यात जर नगरकरांनी सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे दिल्या तर आम्हाला विश्वास आहे की राज्यात येणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडून माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी भरीव निधी आणून जलद गतीने दर्जेदार कामे करू, अशी ग्वाही यावेळी किरण काळे यांनी नगरकरांना दिली आहे.