गृहलक्ष्मी…एक शक्ती अतिशय सुंदर लेख आवर्जुन वाचा.
लेखन - हिरकणी सौ. अनिता गुजर डोंबिवली

दिवस किती भराभर पुढे जातात कळतच नाही. गणपती गेले नी लगेच पितृपक्ष सुरू झाले . कालच आयोनवमी झाली.. झाले… आता हा ही पंधरवडा संपला की सर्वपित्री अमावस्या . तिथी सोडून उरल्या सुरल्या सर्व पितरांना करायचे पिंडदान . जरा उसंत नाही बाई ह्या स्त्रीला . लगेचच नवरात्रीचे ,देवीचे घट बसतात .सर्व जण दसरा, दिवाळीच्या सुट्टी चे नियोजन करतात तर स्त्री ही ह्या सर्व एकापाठोपाठ येणाऱ्या सणांच्या कामाचे नियोजन करते. ती तिचा आंनद लुटते तो साफसफाई करण्यात .
एकच विचार मनात घरात देवी बसणार मग घरच्याच लक्ष्मीने साफसफाई करून तिला आमंत्रित करायला हवे . मग काय कोणी मदत करू की नको ती आपली मोहीम फत्ते करते. कुठून जोर येतो बरे तीला… दुसरे काही नाही फक्त सणाची उत्सुकता ! घर सांभाळून व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला ऑफिस ची कामे सांभाळून ही सर्व कामे करावी लागतात. पण मनाशी ठरवल्याप्रमाणे स्त्री हे सर्व जमवून आणते .
घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातुन सर्व वस्तूंवरून अगदी मायेने हात फिरवून स्वच्छ करते . त्याचा आनंद ती कितीही दमलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. देवीच्या आगमनासाठी कुठून शक्ती मिळते काय माहीत नाहीतर कधी पाय दुखतात, तर कधी कंबर दुखते , पण ह्यावेळी ह्या सर्व दुःखांचा विसर पडून देवीच्या आगमनासाठी सज्ज होते .
घरा घरातील ही स्त्री, गृहलक्ष्मी स्वर्गलोकीच्या देवीच्या आगमनासाठी हात जोडून आमंत्रण देते . मग नऊ दिवस उपवास, आरती,जोगवा,घागर फुंकणे , देवीची भजने, भोंडला,नवदिवसाचे पारणे, आणि मग दसरा अशा सर्व गोष्टींसाठी ती स्वतःच्या अंतरातच नवदुर्गेला सामावून घेते .
खरंच ह्या प्रत्येक घरातील गृहलक्ष्मी म्हणजे एक शक्ती आहे
माझा घराघरातील प्रत्येक स्त्रीला नमस्कार आणि सलाम तिच्या कार्याला🙏
बोलो अंबे माता की जय🙏🙏🙏