
अहमदनगर शहरात साजरा होणारा पद्मशाली समाजाचा सर्वात आवडता सण म्हणजे बागुलू पंडुगू तोफखाना व बालिकाश्रम भागातील मंदिरात या दिवशी पद्मशाली समाजाचे जत्रेचे स्वरूप असते.
आपले समाज बांधव सहकुटुंब *पोशम्मा तल्लीचे* दर्शन घेऊन देवीला थंड पाणी कडुनिंबाचा पाला लिंबू हळद कुंकू नारळ, पुष्पहार अर्पण करून गोड पुरी ,दही, हळदीचा पिवळाभात,मेथीची भाजी, फुटाणे,ओवा,कांदा या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवितात. तोफखानातील मंदिराच्या बाजूला पूर्वीच्या काळी देखील कोंबड्यांचा बळी दिला जात होता,
मात्र आता बदलत्या काळा प्रमाणे पशु बळी देण्याची ही प्रथा सर्वांनुमते बंद करण्यात आली. पोशव्वा तल्लीने ( शीतला माता देवी) सर्वांचे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगां पासून सर्व अबालवृद्धांचे संरक्षण करावे म्हणून देवीची* *प्रार्थना केली जाते .
मंदिराच्या परिसरात लहान मुलांची खेळणी ,फुगे, फेरीचा धंदा करणारे यांचा बाजार असतो. सगळीकडे आनंदीत वातावरण असते. बागुलू पंडुगू दिवशी पद्मशाली लोक कामाला सुट्टी घेऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात.
पूर्वी अहमदनगर शहर माळीवाडा वेशीपासून दिल्ली गेट पर्यंतच होते दिल्ली गेटला सिद्धी बाग आहे बागुलू पंडुगू म्हणजे बागेचा सण साधारण ” निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पूर्वी आपले बांधव भोजन करायचे, तीस – पस्तीस वर्षांपूर्वी पद्मशाली समाज नगर मधील तोफखाना, बागडपट्टी विभागात बहुसंख्येने होते .जशी जशी आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारत केली तसे तसे शहराच्या उपनगरात आता बरेच पद्मशाली बांधव स्वतःचे घर घेऊन वास्तव्य करीत आहे .
सावेडीतील बालाजी मंदिर येथील पोशव्वा तल्ली, लचमव्वा तल्ली मंदिरात मोठी गर्दी जमते. नगर शहरात समाज बांधवांकडून विविध भागातून पोतराजांना बोलवून वाजत गाजत (बोनालू) मिरवणूक काढली जाते.
या निमित्ताने पद्मशाली समाजाचे नगरकरांना आपल्या समाजाचे एकतेचे दर्शन घडते.
बागुलू पंडुगू सणाच्या निमित्ताने तेलुगु संस्कृतीचे महाराष्ट्रातील इतर सर्व समाज बांधवांना अवगत होते.