शाळा सुरू होताच सुट्टी… नवीन शैक्षणिक सत्रात वेळ सकाळी नऊ वाजता

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळांची वेळ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आता सकाळी नऊ असणार आहे.
दरम्यान, १५ जूनला शाळेचा पहिला दिवस असला तरी १६ जूनला रविवार तर १७ तारखेला बकरी ईद असल्याने पुढील दोन दिवस लगेचच शाळांना सुटी असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी एलकेजी, यूकेजी वर्गापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचे धोरण सरकार पातळीवर विचाराधीन आहे.
परंतु, त्यासंबंधीचा निर्णय अजून झालेला नाही. अशा परिस्थितीत ‘आरटीई’ प्रवेशाच्या निकषात बदल करून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढीचा प्रयत्न झाला. पण, या बदलाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने ‘आरटीई’चे प्रवेश पूर्वीप्रमाणेच राबविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता शिक्षकांनाच गुणवत्तावाढीसाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी मिठाई वाटून, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे विशेषतः पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर लगेच दोन दिवस विद्यार्थ्यांना सुटी असेल.
मंगळवारपासून (ता. १८) पुन्हा नियमित शाळा सुरू होतील.