भंडारा जिल्ह्यात तीन तास ढगफुटी सदृष्य पाऊस
नागपूर - रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ, अनेक ठिकाणी पूरस्थिती

मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली असतानाच शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून तब्बल साडेबारा वाजेपर्यंत अक्षरश: ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. तब्बल तीन तासापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भंडारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे.
सर्वत्र जलमय स्थिती
तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे तुमसर शहरातील मुख्य मार्गावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले. यासोबतच तुमसर वन विभागाच्या कार्यालयासह वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात या मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने तिथे जलमय परिस्थिती निर्माण झाली.
वसाहतीत पाणी शिरल्याने तेथील कुटुंबीयांनी वर्षभरासाठी घेऊन ठेवलेले जीवनपयोगी साहित्य पाण्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे या वस्तूंची नासाडी होण्याची भीती वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर, मोहाडी, भंडारा येथील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली आहे. या मुसळधार पावसाने अनेक नागरी वसाहती जलमय झाल्या आहेत.
आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज
गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे असह्य गर्मी आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गुरूवारी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. पूर्व विदर्भात सर्वदूर पाऊस आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने आणखी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूर जिल्ह्यातही दोन दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस आहे.