मुंबईत साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले
मुंबई - मलेरिया, डेंग्यूसह स्वाईन फ्लूचाही धोका

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत असून, स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या ५६ रुग्णांची नोंद झाली आहे, तर मलेरिया २२६, डेंग्यू १५७, लेप्टोचे ७५ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पावसाळी आजार बळावत असल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
जून महिना कोरडा गेल्याने यंदा पावसाळ्यात उद्भविणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत होते. मात्र, संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे ५७९, मलेरियाचे ७२१, लेप्टोचे ३७७, गॅस्ट्रोचे १६४९, कावीळ १३८, स्वाईन फ्ल्यू ८६ आणि चिकनगुनियाचे २४ रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ ऑगस्टमध्येही कायम असून, सर्वच पावसाळी आजारांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात एकूण तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष ५०० बेडही तैनात आहेत. तसेच संध्याकाळी ४ ते ६ वा. पर्यंत ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय, कीटकनाशक विभागाकडून ही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबविण्यात येत आहे.
मलेरिया – २२६
डेंग्यू – १५७
लेप्टो – ७५
स्वाईन फ्लू – ५६
गॅस्ट्रो – २०
चिकनगुनिया – ९
कावीळ – ६
आठवड्याभरात आढळलेले रुग्ण....