
नगर शहराच्या उपनगरी भागात असलेल्या तपोवन रोडवर एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमबाजी करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२७) रात्री ११.३० च्या सुमारास घडली आहे.
पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) याच्या विरुद्ध अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलगी तपोवन रोड परिसरात एका वस्तीवर कुटुंबासह राहते. आरोपी बुधवारी रात्री मोटारसायकलवर पिडीतेच्या घराजवळ आला आणि त्याने तिला फोन करून बाहेर ये तुझ्याकडे महत्वाचे काम आहे असे सांगितले. ती मुलगी बाहेर आल्यावर तिला तपोवन रोड परिसरातील एका शाळेच्या मोकळ्या मैदानात घेवून गेला. तेथे तिला दमदाटी करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
काही वेळात पिडीतेची आई तिला शोधात आली असता तिचा आवाज ऐकून आरोपी तेथून मोटारसायकलवर पसार झाला. तसेच गुरुवारी (दि.२८) सकाळी १० वाजता पुन्हा मोबाईल वर फोन करून तुम्ही जर पोलिस केस केली तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकील, तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली.
या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी विनोद भोसले याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७६ (३), ३५४, ३२३,५०६ सह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.