
मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहत असतानाच सर्वसामान्य मुंबईकरांसमोर विचित्र समस्या निर्माण झाली आहे. शहर, पूर्व, पश्चिम उपनगरांत जुन्या चाळी, इमारतींचे आयुर्मान अपेक्षेपेक्षा अधिक झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेली या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर या रहिवाशांना पुढील किमान तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावरील घरांमध्ये राहावे लागणार आहे.
मात्र, मुंबई शहरासह उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील विविध भागांत भाड्याच्या घरांची मागणी तीव्र वाढली आहे. परिणामी घरमालकांनी घरांचे भाडे किमान १५ ते २० टक्क्यांनी वाढवले आहे.
मुंबईतील बऱ्याचशा भागांत करोनामुळे मागे पडलेले जुन्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प दोन वर्षांपासून सुरू झाले आहेत किंवा परवानगीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यातील अनेक रहिवासी भाड्याच्या घरात जाऊ लागले आहेत. अनेकांचे प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याने त्यांनी भाड्याच्या घरांची शोधाशोध सुरू केली आहे.
नेमकी मागणी वाढत गेल्याने घरभाड्यांमध्ये किमान १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे आढळून येत आहे. तसेच, अनामत शुल्कामध्येही मोठी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट एजंट्सनीही त्यात भर टाकली आहे. भाड्याच्या घरांसाठी इस्टेट एजंटकडून एका महिन्याची भाड्याची रक्कम घेतली जाते. ही रक्कम वाढल्यास जास्त फायदा होण्यासाठी एजंटही ज्यादा भाडे रक्कम सांगत असल्याचे अनुभव येत आहेत.