
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे आतापासूनच काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसत आहे. यातच काहीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्यातील विविध भागात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने कोकण किनारपट्टीतील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.