अजित पवार गटातील नेते म्हणतात, भाजपसोबत जाण्याचा निर्णय योग्य योग्यचं
अहमदनगर

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याच्या आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तथापि, सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने योग्य ठरवले आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात आजपासून नवे पर्व सुरू झाल्याचे सांगून पक्षांतर्गत विरोधक शरद पवार गटाला त्यांनी खडे बोल सुनावले.
राष्ट्रवादीच्या पूर्व विदर्भातील गोंदिया येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना तटकरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे योगदान किती मोठे आहे हे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो त्यांच्याशी संवाद साधला त्यावरून दिसून येतो. माझ्या नेत्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही तटकरे म्हणाले.
भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो असा आरोप होतो. ज्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली होती. मग ते काय होते? असा प्रश्नही तटकरे यांनी उपस्थित केला.
आपल्या पक्षाचा विकासाचा मुद्दा असून विकासाच्या वाटेवर आपल्याला चालायचे आहे. ‘घड्याळ तेच आहे वेळ नवी’ आहे. या नव्या वेळेनुसार विकास करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे वैदर्भीय नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.