ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते.
उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत. बाबामहाराज सातारकर यांचं खरं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्यामध्ये झाला होता.
बाबामहाराज सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबामहाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची विशेष आवड होती.
बाबामहाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबामहाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा बाबामहाराजांनी पुढे सुरु ठेवली.
बाबामहाराज सातारकर परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांचे शिष्य झाले. वयाच्या 8 व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. वयाच्या 11 व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
मानकरी म्हणून परंपरा
1950 ते 1954 या काळावधीमध्ये बाबामहाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. मात्र पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत बाबामहाराजांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे 150 वर्ष परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबामहाराज यांच्याकडे 80 वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी होण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्षे राखली.