पंढरपूरचे ‘आनंद दिघे’ हरपले, ठाकरेंचे कट्टर समर्थक संजय घोडकेंचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
सोलापूर

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान तालुकाप्रमुख तथा पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके (वय ६०) यांचे आज सकाळी दहा वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.
पंढरपूर मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून संजय घोडके यांचा संघटनात्मक कामात सहभाग आहे. शाखा प्रमुखापासून त्यांचा शिवसेनेतील प्रवास सुरु झाला. पंढरपूर शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदावर त्यांनी निष्ठेने आणि धाडसाने काम केले. ते लहानपणापासून दिवंगत धर्मवीर आनंद दिघेंचे मोठे चाहते होते. विशेष बाब म्हणजे, त्यांना पंढरपूरचे आनंद दिघे म्हणून देखील ओळखलं जायचं.
पंढरपूर तालुका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात संजय घोडके यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर पंढरपूर नगरपरिषदेत सेनेचे ६ नगरसेवक निवडून आणले.
त्यावेळी ते स्वतः उपनगराध्यक्ष झाले. कालांतराने ते काहीकाळ नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्यशी सुसंगत घोडके यांचे कार्य होते. राजकारण, समाजकारण, गोरगरीब, निराधार आदींमध्ये मामा म्हणून संजय घोडके हे परिचित होते.
धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ, स्व. मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना घोडके यांनी केली होती. परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. गोरगरिबांची कणव, अन्याय विरुद्ध आवाज उठविण्याची त्यांची धाडसी वृत्ती, अभ्यासू व परखड वक्ता म्हणून त्यांची ओळख होती.
आज सकाळी १०च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली. घोडके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर शिवसेनेसह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.