
शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत कोसळणार्या पावसामुळे नगर शहरात अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले, झाडे पडली, विजेचे पोल, तारा तुटून नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांनी तातडीने मदत केली. परंतु याही पेक्षा जास्त सतर्क राहून नागरिकांच्या अडचणी सोडवून मदतकार्य प्रभावीरीतीने राबवा, अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या आहेत.
आयुक्त डॉ. जावळे यांनी रविवारी तातडीची अधिकारी, विभाग प्रमुखांची आपत्कालीन व्यवस्थापन बैठक बोलाविली होती. या बैठकीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीत तातडीची व्यवस्था करा, नागरिकांना सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भावनांचा सन्मान ठेवत प्रत्येक ठिकाणी मदतकार्य पोहोचले पाहिजे, तसेच कर्मचारी वर्ग संख्या वाढवा, यंत्र सामुग्री वाढवा असे आदेश दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, अजित निकत, घनकचरा विभाग प्रमुख सहायक आयुक्त सपना वसवा, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. जावळे म्हणाले की, मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्षात फील्डवर जाऊन काम करावे, जेणेकरून जनतेचे प्रश्न तातडीने सोडविले जातील. नगर शहरातील जनतेच्या अपेक्षा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत त्या सोडण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. प्रश्न निर्माण होण्याआधीच सोडविण्याचे काम करावे, शहरातील जनतेला सुरक्षा देण्याचे काम आपले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, नागरिकांनी आपत्कालीन संकटात तातडीची मदत मिळवण्यासाठी मनपा अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.