ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बाप्पाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक, पण मुंबईत खड्ड्यांचे विघ्न कायम

मुंबई

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला केवळ एक आठवडा शिल्लक राहिलेला असताना मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न मात्र अद्याप दूर झालेले नाही. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मार्गातील खड्डे एका आठवड्यात बुजवा, असे आदेश महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी २९ ऑगस्ट रोजी पालिकेच्या संबंधित यंत्रणांना दिले होते.

मात्र, हे आदेश कागदावरच राहिल्याचे दिसत असून पालिकेच्या या ढिम्म कारभारावर गणेशोत्सव समन्वय समिती आणि सामाजिक संस्थांनी टीकेची झोड उठवली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांना सामोरे जावे लागते. यंदाही तीच परिस्थिती असून खड्ड्यांबरोबरच रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर होणाऱ्या असमतोल रस्त्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी २९ ऑगस्ट रोजी गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनमार्गांचा आढावा घेतला होता.

त्यानंतर आवश्यक असेल तिथे रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच यंदाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भातही त्यांनी मध्यवर्ती यंत्रणांसह परिमंडळ सहआयुक्त, उपायुक्त, २४ विभागांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांना आदेश दिले होते.

आयुक्तांच्या आदेशाला ११ दिवस उलटून गेल्यानंतरही मुंबईतील अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम असून, असमतोल रस्ते समतोल झालेले नाहीत. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.

त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि असमतोल रस्त्यांचा धोका पत्करून यंदा नाईलाजास्तव अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आत्तापर्यंत गणरायांच्या आगमन मिरवणुका काढल्या. आता आगामी दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम न झाल्यास गणेशोत्सव मंडळांना गणरायांच्या विसर्जन मिरवणुकाही खड्डेमय रस्त्यांवरूनच काढाव्या लागणार आहेत.

त्यामुळे गणरायाच्या आगमन-विसर्जन मिरवणुकांवरील विघ्न कायम आहे. एका आठवड्यात खड्डे बुजवण्यात येणार होते. मात्र, खड्डे बुजवल्याचा आणि रस्ते समतोल केल्याचा पालिकेचा दावा फोल ठरला आहे.

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी मुंबई पालिकेकडे पुन्हा करत असल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे