
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित भागात राहणाऱ्या व्यावसायिकांना वर्गणीसाठी जबरदस्ती करण्याचा प्रकार वाढत आहे. अशा प्रकारे लोणी काळभोर परिसरात लोणी स्टेशनच्या समोर न्यू बालाजी ट्रेडर्स या दुकानाचे व्यावसायिकास गणपती वर्गणी न दिल्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी चार आरोपींवर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दिनेश भिकाराम गोरा (वय -20 ,राहणार -लोणी काळभोर ,पुणे ) यांनी आरोपीं विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिवम जयपाल सिंग (वय – 27), तुषार संजय थोरात (वय- 19 ),निखिल दिलीप कांबळे (वय -19 )व एक अनोळखी कार्यकर्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या मामेभावासोबत न्यू बालाजी ट्रेडर्स या किराणा दुकानात काम करत होते.
त्यावेळी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे व अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते संबंधित ठिकाणी आले. सदर आरोपी कार्यकर्त्यांनी गणपती उत्सव कार्यक्रमाकरिता तीन हजार रुपयांची वर्गणी मागून त्याबाबत जबरदस्ती केली. मात्र, दुकानदार हे स्व इच्छेने 101 रुपयाची वर्गणी देण्यास तयार असताना, कार्यकर्त्यांनी 3 हजार रुपयांचे वर्गणीचा मागणीचा तगादा लावला.
मात्र, दुकानदार वर्गणी देत नसल्याने आरोपी शिवम सिंग ,तुषार थोरात व निखिल कांबळे यांनी दुकानदारास हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच आरोपी तुषार थोरात यानी दुकानातील कॅल्क्युलेटर व व्यावसायिकाच्या मोबाईलची तोडफोड करून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस धायगुडे पुढील तपास करत आहे.