नगर शहरातील प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील ३२ गाळेधारकांना महानगरपालिकेच्या नोटीसा
अहिल्यानगर

२७.२८ लाखांच्या थकबाकीपोटी जप्ती कारवाईचा इशारा..
तत्काळ थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर शहरातील महानगरपालिकेच्या गंज बाजार व सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांवरही महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. येथील गाळेधारकांकडे २७.२८ लाख रुपयांची थकबाकी असून, तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील, अशा नोटीसा ३२ गाळेधारकांना बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महानगरपालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. यात प्रोफेसर चौक व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे २७.२८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. तसेच, बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ८१(ब) नुसार कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. बहुतांश गाळेधारकांचे करारनामे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे थकीत रक्कम तत्काळ न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.