शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे विद्यार्थी ताटकळले
अहमदनगर प्रतिनिधी

लाभार्थींना घेऊन निघालेली बस आ. तनपुरेंनी अडवली, रस्त्यावर ठिय्या मांडला.
शिर्डीत आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील ६३३ बस पाठवण्याचे नियोजन होते. त्यामुळे ग्रामीण भागात बस उपलब्ध न झाल्याने शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी गुरुवारी सकाळपासून बसस्थानकात ताटकळले.
माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शासन आपल्या दारी कार्यक्रमावर संताप व्यक्त केला. हा कार्यक्रम सरकारची केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील लाभार्थींना शिर्डीला नेण्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल ६३३ बस गाड्यांचे नियोजन आखले होते.
या नियोजनामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी बस उपलब्ध झाली नाही. आमदार तनपुरे यांनी गुरुवारी सकाळीच वांबोरी बसस्थानकात जाऊन ताटकळत थांबलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
कार्यक्रमाला जाण्यासाठी कालपासून दोन गाड्या मुक्कामी पाठवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने आ. तनपुरे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला. कार्यक्रमासाठी निघालेली बस थांबवून लाभार्थींशी चर्चा केल्यानंतर त्यातील एका प्रवाशाने शिर्डीला दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले.
शासन दारी, तर तिकडे का बोलावले ?
बस आरक्षित केल्याने विद्यार्थ्यांना बस नसल्याने गैरसोय झाली आहे. खंडाबा येथील काही विद्यार्थिनींना तीन ते चार किलो मीटरपर्यंत चालत जावे लागले. शासन आपल्या दारी आहे की, लोकांच्या गैरसोय होण्याकरता आहे. सरकारने दाखले दारात द्यायला हवे होते.
ही सरकारची स्टंटबाजी आहे. शासन आपल्या दारी असेल तर लोकांना तिकडे का बोलावता, असा सवालही दिव्य मराठीशी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. या घडलेल्या सर्व प्रकारावर त्यांनी या वेळी संताप व्यक्त केला.
वाहतुकीचे नियोजन नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाकडे प्रवासी सेवेसाठी सुमारे सहाशे बस उपलब्ध आहेत. त्यापैकी सुमारे ४०० बस व इतर जिल्ह्यांच्या विभागातून २३१ बसची व्यवस्था शासन आपल्या दारी उपक्रमासाठी केली. त्यामुळे बहुतांश ग्रामीण फेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय झाली. पर्यायी व्यवस्था असती तर प्रवाशांची गैरसोय टळली असती.
गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केले.
शिर्डी विमानतळा जवळील काकडी येथे “शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी’ अभियानात नगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी ३० हजार लाभार्थी येथे उपस्थित आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.