
स्वातंत्र्यदिनाची हक्काची सुट्टी, त्याला जोडून आलेली पतेतीची सुट्टी व सप्ताहअखेर अशा पाच दिवसांतील चार सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी ‘वीकेण्ड’साठी पर्यटनस्थळांकडे धाव घेतली आहे.
प्रामुख्याने सह्याद्रीच्या कुशीतील फार्म हाऊसेसना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. या सुट्ट्यांमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर गर्दी झाली आहे. खड्डेग्रस्त मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या सहा किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या.
खासगी कचेऱ्या सोडून सरकारी कार्यालये, बँका, शाळा व कॉलेजांमध्ये शनिवार, १२ ऑगस्टपासून बुधवार, १६ ऑगस्टपर्यंत सुट्ट्यांची रेलचेल आहे. त्यामध्ये केवळ सोमवारच्या कामाच्या दिवसाचा अडसर आहे. अनेकांनी सोमवारी सुट्टी घेऊन पूर्ण पाच दिवस म्हणजेच जवळपास आठवडाभराच्या सुट्टीची जय्यत तयारी केली आहे.
त्यासाठी अनेकांनी शुक्रवारी सायंकाळीच शहराबाहेर निवांत जागी मुक्काम हलवला. सुट्टी घालविण्यासाठी शुक्रवारी दुपारपासूनच हजारो मुंबईकर बाहेर पडल्याने महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या मार्गिकेचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवरूनच दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. खड्ड्यांमुळे तसेच टँकर, ट्रेलरसारख्या अवजड वाहनांमुळे प्रवासाचा वेग मंदावला आहे. पळस्पे ते शिरढोण येथे वाहतूक खोळंबा होत आहे. तर खारपाडा पुलापुढे सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत शनिवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मागील महिन्यातील दमदार पावसामुळे सध्या डोंगररांगा हिरवळीने नटल्या आहेत. याच डोंगररांगांच्या कुशीतील माळशेज, कर्जत, मुरबाड, माथेरान येथील फार्महाऊसवर गर्दी झाली आहे.
एका हॉटेलमध्ये काम करणारे राजेश गायधने यांनी सांगितले की, ‘कर्जत, माथेरान पायथा, वांगणी, पळसदरी या परिसरात जवळपास ५० फार्महाऊस व तितकीच लहान-मोठी हॉटेले आहेत. ही सर्व हॉटेले व फार्महाऊसचे पुढील आठवड्या पर्यंतचे आगाऊ बुकिंग पूर्ण झाले आहे.
दुसरीकडे मुंबईहून समुद्रमार्गे रायगड व प्रामुख्याने अलिबागला जाण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याने अनेकांनी त्या सहलीचेही नियोजन केले आहे. गेट वेहून मांडवा व अलिबाग येथे जाण्यासाठीच्या लाँच, कॅटामरानला शुक्रवार दुपारनंतर गर्दी होती.
काही मोठ्या बोटी माझगाव येथून मांडव्याला जातात. याअंतर्गत एक प्रमुख रो-रो सेवा सुरू आहे. या रो-रो सेवेचे शनिवार व रविवारचे बुकिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.