अहिल्यानगरमध्ये २८ मे रोजी वाहतूक मार्गात बदल

अहिल्यानगर मधे दिनांक २८ मे रोजी ‘बकरी ईद’ सणानिमित्त अहिल्यानगरच्या कोठला ईदगाह मैदान येथे नमाज पठण होणार आहे. हे मैदान अहिल्यानगर – पुणे महामार्गालगत असल्याने, नमाज पठणात वाहनांच्या हॉर्नमुळे अडथळा येऊ नये आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत या मार्गावरील चारचाकी व जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
बंद राहणारा मार्ग – अहिल्यानगर – पुणे महामार्गावरील एस.पी.ओ. चौक ते जी.पी.ओ. चौक.
पर्यायी मार्ग : १) संभाजीनगर व मनमाड रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी- एस.पी.ओ.चौक ➔ न्यायनगर मार्गे ➔ बेलेश्वर चौक ➔ किल्ला चौक ➔ जी.पी.ओ. चौक ➔ चांदणी चौक मार्गे इच्छित स्थळी.
२) सोलापूर रोड, जामखेड रोड तसेच पुणे रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी – जी.पी.ओ.चौक ➔ बेलेश्वर चौक ➔ न्यायनगर ➔ एस.पी.ओ.चौक मार्गे इच्छित स्थळी.
३) पुणे रोडकडून उड्डाणपुलाचा वापर करून येणाऱ्या वाहनांसाठी- चांदणी चौक येथे उतरणारे उड्डाणपुल मार्गाचा वापर करून चांदणी चौक ➔ जी पी ओ चौक ➔ बेलेश्वर चौक ➔ न्यायनगर ➔ एस.पी.ओ.चौक मार्गे इच्छित स्थळी.
नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
मुस्लिम समाजाचा पवित्र बकरी ईद सण उद्या गुरूवारी (28 मे) मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. जिल्हाभरात सुमारे दोन हजार 500 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचार्यांचा बंदोबस्त, 22 ठिकाणी चेकपोस्ट, पाच भरारी पथके तसेच वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे.
बकरी ईद काळात कुर्बानीसाठी गोवंश वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गोवंश वाहतुकीवरून कोणताही वाद निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात तब्बल 22 ठिकाणी विशेष चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून संशयित वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
याशिवाय, बकरी ईद कालावधीत गोवंश वाहतूक व गोमांस प्रकरणांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पाच विशेष भरारी पथके दिवस-रात्र कार्यरत ठेवली आहेत. ही पथके विविध भागात अचानक तपासणी करत असून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.




