लालपरी ला रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख उपस्थित होते. माध्यमांना संबोधित करताना रितेश देशमुखने विलासराव देशमुख यांची एक आठवणही शेअर केले.
रितेश म्हणाला, “माझी आणि जेनेलियाची एसटीच्या ब्रॅण्ड अम्बेसिडरपदी नियुक्ती केल्याबद्दल मी प्रताप सरनाईक यांचा आभारी आहे. मी लहानपणी वडिलांबरोबर एसटीने प्रवास केला आहे. माझ्या वडिलांचा जास्ती जास्त प्रवास एसटीने झाला आहे. परिवहन खातंही त्यांनी सांभाळलं आहे. एसटी लहानपणी माझ्या आयुष्याचा भाग होती. त्यामुळे मी आता ब्रॅण्ड अम्बेसिडर झालोय याचा मला अभिमान आहे. माझ्या आणि जेनेलियाच्या परीने ज्या सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत.”
यावेळी त्याने त्याचे वडील विलासराव देशमुख यांच्याविषयीही एक आठवण सांगितली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी बोलताना रितेश म्हणाला, “लातूर, पुणे भागात साहेब एसटीने जायचे. एसटीने प्रवास करताना कसे दोरी ओढायचे, पैसे द्यायचे हे ते नेहमी सांगत असत. तोच प्रवास आम्हीही त्यांच्याबरोबर केला होता. बाबळगावमध्ये त्यांचा अजूनही एक फोटो आहे. ज्यात ते एसटीत बसले आहेत आणि त्यांचा बाहेरून फोटो काढला आहे. तो फोटो आमच्या संपूर्ण परिवाराचा जवळचा फोटो आहे. एसटीमध्ये खिडकीजवळची सीट ही त्यांची आवडती जागा होती. ते म्हणायचे की खिडकीजवळ बसलो की वारा येऊन मस्त झोप लागते.”




