ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सुशीला जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

अहिल्यानगर

गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी सुशीला दर्शन जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र आणि विशेष न्यायाधीश एम. एच. शेख यांनी फेटाळून लावला आहे. तोफखाना आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

या दोन्ही प्रकरणांत फिर्यादींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभिजित पुप्पाल यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील एम. व्ही. दिवाने यांनी कामकाज पाहिले.आरोपी सुशीला जगताप यांचा मुलगा राहुल (आरोपी क्र. १) आणि सून एंजल (आरोपी क्र. २) हे स्वतःला एका कंपनीचे मालक असल्याचे भासवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत असत. गुंतवणूकदारांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मिळालेली रक्कम आरोपी सुशीला जगताप यांच्या बँक खात्यात जमा केली जात होती फसवणूक उघडकीस आल्यावर सुशीला जगताप या ‘ज्येष्ठ नागरिक आणि महिला’ असल्याचा फायदा घेत अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या.

मात्र, अशा प्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून यात सुशीला यांचा सकृतदर्शनी सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हा: 24 लाख 70 हजार रुपयांच्या फसवणूक याप्रकरणी योगी महेंद्र सबलोक (वय ४७, रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी राहुल दर्शन जगताप, त्याची पत्नी एंजल राहुल जगताप आणि आई सुशीला दर्शन जगताप (तिघे रा. सानपाडा, नवी मुंबई) यांनी संगनमत करून हा गुन्हा केला. राहुलने आपण ‘मेक माय ट्रिप’ आणि ‘ऑनलाईन ट्रॅव्हल्स’ कंपन्यांचे एजंट असल्याचे सांगून ‘रिजीईस इव्हेंट ऑर्गनायझर ट्रॅव्हल्स’ नावाची कंपनी चालवत असल्याचे भासवले.

यावर विश्वास ठेवून सबलोक यांनी ३१ ऑगस्ट २०२४ ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ९५ लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात वर्ग केले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी ७० लाख ३० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित २४ लाख ७० हजार रुपये आणि ठरलेले कमिशन देण्यास टाळाटाळ केली. आरोपींनी दिलेले धनादेशअकाउंट ब्लॉक्ड किंवा स्टॉप पेमेंट मुळे बाऊन्स झाले. या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांत (गुन्हा क्र. ०५४०/२०२५) बीएनएस कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आनंद अशोक कोकरे करत आहेत. या गुन्ह्यातील सुशीला यांचा जामीन अर्ज क्र.२२३/२०२६ न्यायालयाने फेटाळला.

दुसऱ्या प्रकरणातील राजेश बन्सल या फिर्यादीने तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये सुशीला जगताप यांच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. यापैकी ३ कोटी ९० लाख रुपये त्यांना परत मिळाले. उर्वरित ८० लाख रुपये आणि कमिशनची रक्कम वारंवार मागणी करूनही आरोपींनी परत केली नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत (गुन्हा क्र. ०५९६/२०२५) बीएनएस कलमांसह एमपीआयडी (MPID Act) आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून जामीन अर्ज क्र. २२०/२०२६ फेटाळण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांत सुशीला जगताप यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, फिर्यादींचे वकील ॲड. पुप्पाल यांनी न्यायालयात हस्तक्षेप करून जोरदार आक्षेप नोंदवला.

हा केवळ दिवाणी स्वरूपाचा व्यवहार नसून अशा फसवणुकीच्या अनेक घटना आहेत. उर्वरित रकमेची वसुली आणि सखोल तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले आणि १८ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे