
अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात असलेल्या एका साडी डेपोसमोर लग्नाच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सौमित्र चंद्रशेखर रासने हे केडगाव परिसरात व्यापार करतात. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते नगर-पुणे रस्त्यावरील एका साडी डेपो जवळ उभे होते.
यावेळी आरोपी अक्षय राजू पवार तिथे आला आणि त्याने सौमित्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुला मुलीशी लग्न करायचे आहे का? असे विचारत आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद इतया विकोपाला गेला की, आरोपीने सौमित्र यांच्या कानाखाली मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात गंभीर जखमी केले.
आरोपीने यावेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर सौमित्र रासने यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अक्षय पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




