
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण आता शिर्डीत पोहचले आहे. एव्हाना स्थानिक अधिकारी शांत असताना आता त्याच अधिकार्यांनी छापेमारी सुरू केल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणार्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शिर्डी शहर व परिसरात प्रसाद म्हणून सर्रास विकल्या जाणार्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या विशेष पथकाने शिर्डीत दाखल होत नमुने संकलन मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे.
या कारवाईमुळे शिर्डीतील भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणार्या प्रसाद विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये विकल्या जाणार्या पेढ्यांच्या बॉक्सवर उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख, बॅच नंबर तसेच मुदत समाप्तीची कोणतीही माहिती स्पष्टपणे नमूद केली जात नसल्याच्या तक्रारी भाविकांकडून सातत्याने येत होत्या.
काही ठिकाणी तर पेढ्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर एफडीएच्या छापा पथकाने विविध दुकानांवर अचानक धाडी टाकून पेढ्यांचे नमूने गोळा केले आहेत. हे सर्व नमुने नियमानुसार सील करण्यात आले असून ते तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणार्या विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिली आहे.




